बेळगाव लाईव्ह : राज्यभरातील रेशन दुकानांमध्ये सातत्याने निर्माण होणाऱ्या सर्व्हरच्या समस्येमुळे धान्य वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. सर्व्हर बंद पडणे आणि व्यवहारांना विलंब होणे यामुळे रेशन दुकानदारांसह लाभार्थ्यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही समस्या तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा रेशन दुकानदार मालक संघटनेच्या वतीने बुधवारी (२५ नोव्हेंबर) रेशन कार्यालयात निवेदन देण्यात आले.
सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे रेशन वितरणाचे काम वेळेत पूर्ण होत नसल्याचे दुकानदारांनी निवेदनात म्हटले आहे. अनेक लाभार्थी आपली रोजंदारी सोडून सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेशन दुकानांसमोर रांगेत उभे राहतात. मात्र, सर्व्हरच्या समस्येमुळे त्यांना धान्य मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंगही निर्माण होत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले.
यावेळी सर्व्हरच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय रेशन दुकानदारांना डी ग्रुप कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, दुकानदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना अधिकृत परवाना देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, डीबीटी योजना बंद करून सध्याची धान्य वितरण योजना कायम ठेवावी तसेच सध्या प्रति क्विंटल मिळणारे १५० रुपयांचे कमिशन वाढवून २५० रुपये करावे, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या.
यावेळी कर्नाटक राज्य सरकारी रेशन दुकानदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजशेखर तलवार यांनी सर्व्हरच्या समस्येमुळे बेळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना कामकाज करणे कठीण झाल्याचे सांगितले. अन्न व नागरी पुरवठा विभागाने तसेच संबंधित मंत्र्यांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन सर्व्हर व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हिवाळी अधिवेशनात विधानसौधासमोर आंदोलनाचा इशारा
सर्व्हरची समस्या आज किंवा उद्यापर्यंत सुरळीत करण्यात आली नाही, तर आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसौधासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजशेखर तलवार यांनी दिला. गरिबांच्या हक्काचे धान्य वेळेत वितरित करण्यासाठी सर्व्हर व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता रेशन दुकानदारांच्या या मागण्यांवर राज्य सरकार आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.




