बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी मार्केट पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तीन स्वतंत्र कारवाया केल्या आहेत. या कारवाईत धारदार चाकू बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली असून, दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापे टाकून दोघांना अटक करण्यात आली आहे.
दि. २४ नोव्हेंबर रोजी मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ पथकाने तपासणी मोहीम राबवली. यावेळी मध्यवर्ती बसस्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी धारदार चाकू घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या मयूर सुभाष राऊत (वय ३२, रा. महाद्वार रोड, बेळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक धारदार चाकू जप्त करण्यात आला. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६०/२०२६ अन्वये शस्त्र कायदा १९५९ मधील कलम २७(१) आणि कर्नाटक पोलीस कायदा १९६३ मधील कलम ९७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, मार्केट पोलिसांनी मटका अड्ड्यांवरही छापे टाकले. रविवार पेठ येथील सिद्धरामेश्वर अॅग्रो सेंटरसमोर मटका खेळ सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पंकज मोहन जाधव (वय ३४, रा. कामत गल्ली, बेळगाव) याला मटका खेळासाठी नागरिकांकडून पैसे स्वीकारताना पकडण्यात आले. त्याच्याकडून १,२५० रुपये रोख रक्कम आणि ओसी चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५९/२०२६ अन्वये कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई कोतवाल गल्ली येथील सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली. येथे मटका खेळ चालवत नागरिकांकडून पैसे स्वीकारणाऱ्या मुद्दस्सर मेहबूब देसाई (वय ३४, रा. खंजर गल्ली, बेळगाव) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २,३४० रुपये रोख रक्कम आणि ओसी चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६१/२०२६ अन्वये कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(३) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे. मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय पी. जी. गंडव्वगोळ आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.




