belgaum

लिंबाळेनी सीमा प्रश्नाचा इतिहास मराठी भाषिकांच्या भावना समजून घ्यावा:

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पुणे येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी बेळगाव सीमा प्रश्नाबाबत केलेल्या वक्तव्यावरून सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आणि माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी लिंबाळे यांच्या विधानांचा समाचार घेत सीमा प्रश्नाचा अभ्यास करूनच यावर भाष्य करण्याचा सल्ला दिला आहे.

एका मुलाखतीदरम्यान शरणकुमार लिंबाळे यांनी विद्रोही साहित्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलित पँथर आणि विद्रोही चळवळीविषयी आपली भूमिका मांडताना बेळगाव सीमा प्रश्नाबाबतही भाष्य केले होते. बेळगाव कर्नाटकात आहे म्हणजे काय, पाकिस्तानात आहे काय, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांनी आपण ज्या भागात जातो, तेथील भाषा आणि संस्कृती आत्मसात करावी, असे मत व्यक्त केले होते.

लिंबाळे यांच्या या विधानांवर प्रतिक्रिया देताना मालोजी अष्टेकर यांनी सीमाभागाचा इतिहास आणि येथील मराठी जनतेच्या भावनांची जाणीव करून दिली. संपूर्ण सीमा प्रदेश मराठी भाषिक असून हा भाग महाराष्ट्रात सामील व्हावा, अशी मागणी गेल्या सत्तर वर्षांपासून येथील मराठी जनता करत आहे. हा प्रश्न केवळ भाषेचा नसून मराठी भाषा, लिपी आणि संस्कृतीच्या अस्तित्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

सीमाभागातील मराठी माणूस गेली सात दशके आपल्या भाषिक हक्कांसाठी संघर्ष करत असताना या लढ्याची पार्श्वभूमी समजून न घेता रचनात्मक परिवर्तनाची भाषा करणे खेदजनक असल्याचे अष्टेकर यांनी म्हटले आहे. मराठी भाषा आणि मराठी माणसाचे मराठीपण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात विद्रोहाची भूमिका साहित्यिकांनी का घेतली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आस्था व्यक्त करणाऱ्या शरणकुमार लिंबाळे यांनी या सीमा प्रश्नाबाबत बाबासाहेबांनी काय विचार मांडले आहेत, याचा अभ्यास करून मगच बोलावे, असे आवाहनही अष्टेकर यांनी केले आहे.

थोर व्यक्तींनाही पदामुळे आपल्या विचारांपासून विचलित होता कामा नये, असा सूचक टोला लगावत मालोजी अष्टेकर यांनी लिंबाळे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.