बेळगाव लाईव्ह | बेळगाव
भक्ती, एकता, सामाजिक बांधिलकी आणि परंपरेचा अभिमान जपत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या राजहंस गल्लीच्या राजाने आता राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित २०२६ च्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत श्री राम युवक मंडळ, राजहंस गल्लीच्या गणेशोत्सवाला देशात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. या यशामुळे बेळगावच्या गणेशोत्सव परंपरेचा गौरव राष्ट्रीय स्तरावर झाला आहे.
या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासोबत मंडळाला ५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले असून, राजहंस गल्लीच्या राजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी श्री राम युवक मंडळ, राजहंस गल्लीच्या कार्यकर्त्यांना पाच लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकात्मता, लोकसहभाग आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे प्रभावी माध्यम आहे. या मूल्यांना प्राधान्य देत राजहंस गल्लीच्या युवकांनी केलेल्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
राजहंस गल्लीच्या राजाला मिळालेल्या या सन्मानामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, बेळगावच्या गणेशभक्तांसाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे. राजहंस गल्लीच्या राजाने मिळवलेले हे यश म्हणजे बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेचा राष्ट्रीय गौरवच!
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राजाचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, डॉ किरण कुलकर्णी, पु. ल देशपांडे कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर अभिनेते सागर कारंडे, पंढरीनाथ कांबळे,जयवंत वाडकर देशभरातील मूर्तिकार बांधव,जगभरातील गणेशोस्तव मंडळाचे पदाधिकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





