belgaum

सेंट झेवियर्स ते गणेशपूर रस्त्याची दुरवस्था कायम..

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सध्या सुरू झाली असून, आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या प्रयत्नातून यासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या सेंट झेवियर्सपासून गणेशपूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, नागरिकांना दररोज ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही.

मागील वर्षी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जागरूक नागरिकांनी या रस्त्यावर विविध फलक लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या प्रश्नाची प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मात्र, रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी प्रशासनाने रस्त्यावर लावलेले फलक आणि भित्तीपत्रके हटविण्यातच तत्परता दाखवल्याची टीका नागरिकांकडून करण्यात आली होती.

 belgaum

आज वर्ष उलटून गेले तरी रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे. मध्यंतरी काही काळासाठी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, ही डागडुजीदेखील एक दिवस टिकली नाही आणि रस्त्याची अवस्था पुन्हा पूर्वीसारखी झाली.

सध्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी मंजूर झालेल्या सहा कोटी रुपयांच्या निधीतून सेंट झेवियर्स ते गणेशपूर या महत्त्वाच्या रस्त्याचाही समावेश करण्यात येणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

अधिवेशनाच्या काळात शहरातील रस्ते चकाचक करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली होतात. मात्र, वर्षानुवर्षे त्रास सहन करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या समस्यांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे यंदा तरी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य देणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.