बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांची नशा करून अजब चाळे करणाऱ्या चौघांचा मार्केट आणि माळमारुती पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला आहे. २६ नोव्हेंबर रोजी शहरात राबवलेल्या मोहिमेत चौघांवर एनडीपीएस कायद्यान्वये कठोर गुन्हे दाखल करत पोलिसांनी नशेखोरांना दणका दिला आहे.
मार्केट पोलिसांनी पहिल्या तडाख्यात शिवनगरच्या पहिल्या क्रॉस परिसरात विचित्र व अस्वाभाविकपणे वावरणाऱ्या अभिजीत भरमा पाटील (२३, रा. शिवाजी नगर, बेळगाव) याला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक मणिकांत पुजारी यांच्या पथकाने वैद्यकीय तपासणी करताच त्याने मादक पदार्थ घेतल्याचे उघड झाले. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू आहे.
दुसऱ्या कारवाईत शिवनगरच्या चौथ्या क्रॉसजवळ सार्वजनिक जागी अजब वर्तन करणाऱ्या सिद्धार्थ दत्ता कदम (२४, रा. शिवाजी नगर, बेळगाव) याच्यावर उपनिरीक्षक पी. ई. गंडव्वगोळ व सहकाऱ्यांनी झडप घातली. वैद्यकीय अहवालात नशेचे सेवन सिद्ध झाल्यावर मार्केट ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
माळमारुती पोलिसांनीही नशेखोरांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. महांतेश नगरमधील ग्लास हाऊस परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या मोहम्मद अर्शलेन अनीसहृद बागलकोटे (१९, रा. वीरभद्र नगर, बेळगाव) याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात अमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून चौकशी सुरू आहे.

अशोक नगरजवळील राष्ट्रीय महामार्गालगतच्या सार्वजनिक ठिकाणी अस्वाभाविकपणे वावरणाऱ्या गफ्रान ऊर्फ अश्फाक अन्वर तेंगनाकेरी (२०, रा. न्यू गांधी नगर, बेळगाव) याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली.
वैद्यकीय तपासणीत नशा केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्याविरुद्ध माळमारुती ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. दरम्यान, या धडक मोहिमेबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.




