बेळगाव लाईव्ह : आगामी महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली असून, या बैठकीत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा होऊन तीन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले की, १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी सीमाप्रश्नासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा बैठकीत तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे. महामेळावा आणि महाअधिवेशनानंतर मध्यवर्ती बैठक घेऊन पुढील साहित्य संमेलनात कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल आणि त्यानुसार पुढील कार्यक्रम आखला जाईल.

महामेळाव्याच्या नियोजनासाठी सहा जणांची समिती जाहीर करण्यात आली असून, ही समिती एक दिवस आधी ठिकाण निश्चित करून कळवेल. पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास ठरलेल्या ठिकाणी शांततेत मेळावा घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने वेळेवर संपर्क साधून परवानगी दिल्यास सर्व काही शांततेत पार पडण्यास मदत होईल, असेही मरगाळे यांनी नमूद केले.
मात्र, प्रशासनाकडून परवानगी नाकारल्यास सहा सदस्यांची समिती ठरवेल त्या ‘गनिमी काव्या’नुसार कार्यवाही केली जाईल. गरज पडल्यास एकत्र येणे, गावागावांत निदर्शने करणे किंवा प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर आंदोलन करणे, असे वेगवेगळे निर्णय त्या कमिटीने घेतल्यास त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, शनिवार (दि. २८ नोव्हेंबर) बेळगाव दौऱ्यावर येत असून, दुपारी ३:३० वाजता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ते धर्मवीर भवन येथे येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या आणि व्यथा त्यांच्यासमोर मांडणार आहे. या पार्श्वभूमीवर, म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी व सीमावासीयांनी उद्या दुपारी ३:०० वाजता सांबरा विमानतळावर मोठ्या संख्येने जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदनाद्वारे कर्नाटकातील मराठी भाषिकांवर होणारे अन्याय-अत्याचार तसेच साहित्य संमेलनाध्यक्षांच्या वक्तव्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर घातली जाईल. तत्पूर्वी, पहिल्या दिवशी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचे निवेदन देण्यासाठी वेळ व परवानगी मागितली होती; मात्र ती नाकारल्याने मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट होत असल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला.
१ नोव्हेंबरच्या सायकल फेरीत सुमारे ३० हजार नागरिक व तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने युवकांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या प्रश्नाची धुरा आता तरुणांनी आपल्या खांद्यावर घेतली असून, पुढील लढ्याची धुरा आणि आंदोलन तरुणांनीच पुढे चालवावे, अशी विनंतीही समितीच्या वतीने करण्यात आली आहे.




