बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात जत रस्त्यावरील प्रसिद्ध ‘ब्रह्मा एंटरप्रायझेस’ या दुकानाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. रविवारी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत फर्निचर, ब्रँडेड कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत तीन कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील बेडग येथील माळी बंधूंच्या मालकीचे हे दुकान फर्निचर, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. पहाटेच्या सुमारास दुकानातून धूर येऊ लागला आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. दुकानातील सोफा, पलंग, टीव्ही, फ्रीज तसेच महागडे कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांना यश आले नाही. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या वाहनाला पाणी भरण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागल्या. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सुदैवाने जीवितहानी टळली
आग लागली त्यावेळी दुकानात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.





