बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी येथील ७२ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ४२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अटकेची भीती दाखवून सायबर भामट्यांनी त्यांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान घडली. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी संबंधित निवृत्त अधिकाऱ्याला मोबाईलवर फोन आला. सुरुवातीला फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेतली. त्यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली.
फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव विजय कान्हा असल्याचे सांगितले. आपण आयपीएस अधिकारी असून केंद्रीय अन्वेषण विभागाशी (सीबीआय) संबंधित असल्याचा बनाव त्याने केला. संबंधित अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी वापरण्यात आल्याचा तसेच त्यांच्या बँक खात्याचा संबंध मनी लॉन्ड्रिंगशी असल्याचा आरोप करण्यात आला.
या गंभीर आरोपांमुळे आणि अटकेच्या भीतीमुळे निवृत्त अधिकारी घाबरले. याचाच फायदा घेत सायबर भामट्यांनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ४२ लाख ४० हजार रुपये हस्तांतरित करून घेतले.

या प्रकरणी बेळगाव शहरातील सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे आणि अमली पदार्थविरोधी पोलीस ठाण्यात (सीईएन) तक्रार दाखल करण्यात आली आहे. या फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
नागरिकांनी सतर्क राहावे!
पोलीस, सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचा दावा करून व्हिडिओ कॉलवर अटकेची भीती दाखवणे आणि पैशांची मागणी करणे, हा सायबर फसवणुकीचा प्रकार असू शकतो. अशा कॉलला घाबरून पैसे हस्तांतरित करू नयेत. सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.





