belgaum

१९५ मराठी माध्यम शिक्षक पदे भरा;खानापूर समितीची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: कर्नाटक शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राज्यात १५ हजार शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बेळगाव विभागासाठी यापूर्वी ८३१ शिक्षक पदे मंजूर करण्यात आली होती. मात्र, १२ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शिक्षक भरती अधिसूचनेत मराठी व इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांमधील रिक्त पदांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या १९५ रिक्त शिक्षक पदांचा तातडीने भरती प्रक्रियेत समावेश करावा, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली.

याबाबत समितीच्या वतीने बेळगावच्या उपसंचालक शिक्षण विभागाच्या (DDPI) श्रीमती लीलावती हिरेमठ यांना १८ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.

निवेदनानुसार, सध्याच्या शिक्षक भरती अधिसूचनेत बेळगाव विभागातील माध्यमिक शिक्षकांची २४० पदे भरण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कन्नड आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील पदांचा समावेश आहे. GPT (इयत्ता ६ ते ८) कन्नड माध्यमासाठी ६५, इंग्रजी माध्यमासाठी ४, गणित व विज्ञान कन्नड माध्यमासाठी ७४, जीवशास्त्र कन्नड माध्यमासाठी ३३, सामाजिक विज्ञान कन्नड माध्यमासाठी ५३ आणि संगणक विज्ञानासाठी ११ पदे जाहीर करण्यात आली आहेत.

 belgaum

खानापूर तालुक्यात २९७ शिक्षक पदांची गरज

खानापूर तालुका हा सीमाभागातील मराठीबहुल तालुका असून, येथे मोठ्या संख्येने मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. तालुक्यात एकूण २९७ शिक्षक पदे रिक्त असून त्यापैकी मराठी माध्यमाची १९५, कन्नड माध्यमाची ९२ आणि उर्दू माध्यमाची १६ पदे आहेत.

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या आणि माध्यमनिहाय गरज लक्षात घेऊन शिक्षकांची भरती करणे आवश्यक असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.

भारतीय संविधानातील कलम २९, ३० आणि ३५०-अ अंतर्गत भाषिक अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक अधिकारांचे संरक्षण करण्याची शासनाची जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मराठी माध्यमाच्या उमेदवारांना संधी देण्याची मागणी

मराठी माध्यमातून D.Ed., B.Ed. तसेच इतर आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेले शेकडो उमेदवार सरकारी सेवेसाठी पात्र आहेत. त्यामुळे त्यांना भरती प्रक्रियेत समान व न्याय्य संधी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

समितीने शिक्षक भरतीची ८३१ पदांची पूर्वीची घोषणा आणि १२ ऑगस्टची भरती अधिसूचना तातडीने पुनरावलोकन करून त्यात मराठी, उर्दू व इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र पदे जाहीर करावीत, अशी मागणी केली आहे.

तसेच खानापूर तालुक्यातील माध्यमनिहाय रिक्त पदांनुसार भरती करावी, १९५ मराठी माध्यम शिक्षक पदांचा सध्याच्या भरती प्रक्रियेत तातडीने समावेश करावा, पात्र D.Ed./B.Ed. उमेदवारांना समान संधी द्यावी आणि शिक्षकांच्या कमतरतेमुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

शासनाने या मागणीवर तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि पात्र उमेदवारांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे.

समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले.यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, प्रकाश चव्हाण, धनंजय पाटील आदी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.