बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक प्रवाशांना अधिक चांगल्या दर्जाची आणि आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वायव्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (NWKRTC) बेळगाव विभागाने तीन महत्त्वाच्या मार्गांवर नवीन प्रतिष्ठित बससेवा सुरू केली आहे. बेळगाव–ठाणे, बेळगाव–बेंगळुरू आणि बेळगाव–धर्मस्थळ या मार्गांवर स्लीपर बससेवा उपलब्ध होणार आहे.
बेळगाव विभागाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत माहिती प्रसिद्ध केली. या बससेवांसाठी ऑनलाइन ई-तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांना KSRTC आणि NWKRTCच्या संकेतस्थळांवर तसेच मोबाईलद्वारे तिकीट आरक्षित करता येणार आहे. याशिवाय बेळगाव बसस्थानकातील आरक्षण काऊंटर आणि अधिकृत बुकिंग एजंटकडूनही आगाऊ तिकीट बुक करता येईल.
बेळगाव–ठाणे राजरथ एसी स्लीपर
बेळगाव–ठाणे मार्गावर राजरथ एसी स्लीपर बससेवा सुरू करण्यात आली असून, तिकीट दर ₹१,२५० आहे. ही बस बेळगावहून रात्री ८.१५ वाजता सुटून संकेश्वर, निपाणी, कोल्हापूर आणि पुणेमार्गे सकाळी ६.३० वाजता ठाणे येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ठाणे येथून रात्री ८ वाजता बस सुटून सकाळी ६.४५ वाजता बेळगावात पोहोचेल.
बेळगाव–बेंगळुरू राजरथ एसी स्लीपर
बेळगाव–बेंगळुरू मार्गावरही राजरथ एसी स्लीपर सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे तिकीट ₹१,३०० आहे. बेळगावहून रात्री ८.४५ वाजता बस सुटून धारवाड व हुबळीमार्गे सकाळी ६.४५ वाजता बेंगळुरूला पोहोचेल. बेंगळुरूहून रात्री ११.१५ वाजता बस सुटून सकाळी ९.१५ वाजता बेळगावात पोहोचणार आहे.

बेळगाव–धर्मस्थळ पल्लक्की नॉन-एसी स्लीपर
धार्मिक पर्यटनासाठी महत्त्वाच्या असलेल्या धर्मस्थळ मार्गावर पल्लक्की नॉन-एसी स्लीपर बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसचे तिकीट ₹१,१५० आहे. बेळगावहून सायंकाळी ७.१५ वाजता बस सुटून हुबळी, अंकोला, कुमटा, भटकळ, कुंदापूर, उडुपी आणि मूडबिद्रीमार्गे सकाळी ६.१५ वाजता धर्मस्थळला पोहोचेल. परतीच्या प्रवासातही धर्मस्थळहून सायंकाळी ७.१५ वाजता बस सुटून सकाळी ६.१५ वाजता बेळगावात पोहोचेल.
या तीनही बससेवांमुळे बेळगावहून महाराष्ट्र, कर्नाटकातील राजधानी बेंगळुरू तसेच धर्मस्थळला प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सोय होणार आहे. प्रवाशांनी या नवीन बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेळगाव विभागीय नियंत्रण अधिकाऱ्यांनी केले आहे.





