बेळगाव लाईव्ह : श्रीक्षेत्र वैजनाथ (ता. चंदगड) येथील पुरातन श्री वैजनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मंदिरासाठी उचगाव (ता. बेळगाव) येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे उचगाव विभागप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते मिथिल बाळू जाधव यांनी तीन लाख रुपये किमतीची सागवानी लाकडाची नक्षीदार चौकट देणगी म्हणून दिली आहे.
या चौकटीचे काम दांडेली येथील प्रसिद्ध नझीर फर्निचर येथे सुरू असून, चौकटीवर पुरातन काळातील विविध कलाकृती आणि आकर्षक नक्षीकाम साकारण्यात येत आहे. या कामासाठी एक लाख रुपयांची रक्कम काडाचे अध्यक्ष युवराज कदम आणि लँड ट्रिब्युनलचे माजी सदस्य बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी चौकटीच्या कामाची पाहणी करण्यात आली.
श्रावण महिन्यात चौकट मंदिरात बसविणार
सदर सागवानी चौकट श्रावण महिन्यात वैजनाथ मंदिरात आणून विधिवत बसविण्यात येणार आहे. दांडेली येथील नझीर फर्निचरचे नामवंत कारागीर या चौकटीवर कलाकुसर करीत असून, पुरातन काळातील कलावैभव जपण्याच्या उद्देशाने त्यावर विविध जुन्या डिझाईन्स आणि नक्षीकाम करण्यात आले आहे.
यावेळी अशोक चौगुले, प्रफुल्ल चौगुले, मिथिल जाधव, मारुती खांडेकर, मुकुंद नवार, अमोल जाधव, संदीप पाटील, पारितोष हुकेरीकर, महेश आनंदाचे, साई पावशे, राहुल सुभेदार, दर्शन देसाई, अंकुश अष्टेकर, सौरभ जाधव, सुनील कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
उचगावच्या श्री रामलिंग मंदिरालाही सागवानी चौकट
उचगाव येथील श्री रामलिंग तलावाशेजारी असलेल्या पुरातन श्री रामलिंग मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही प्रगतीपथावर सुरू आहे. या मंदिरासाठी सामाजिक कार्यकर्ते सौरभ दयानंद जाधव आणि मिथिल बाळू जाधव यांनी संयुक्तपणे सुमारे दोन लाख २१ हजार रुपये किमतीची सागवानी लाकडाची नक्षीदार चौकट देणगी म्हणून दिली आहे.
श्री रामलिंग मंदिर हे या परिसरातील जागृत देवस्थान असून, येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम परिसरातील युवकांनी हाती घेतले असून, पुरातन वास्तुकलेचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच धर्तीवर मंदिरासाठी तयार करण्यात येणाऱ्या चौकटीवरही पुरातन कलाकृतींचे नक्षीकाम करण्यात येत आहे.
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान : युवराज कदम
यावेळी बोलताना काडाचे अध्यक्ष युवराज कदम म्हणाले की, वैजनाथ येथील श्री वैजनाथ देवस्थान आणि उचगाव येथील श्री रामलिंग देवस्थान ही दोन्ही पुरातन आणि जागृत शिवमंदिरे आहेत. या दोन्ही ठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
वैजनाथ मंदिराचा शासनामार्फत जीर्णोद्धार सुरू असून, मंदिराचे आकर्षक रूप साकारण्याबरोबरच पुरातन काळातील कला आणि वास्तुवैभव जपण्याचे काम केले जात आहे. मंदिरासाठी मिथिल जाधव यांनी सागवानी चौकट देणगी दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

रामलिंग मंदिराचा पुरातन वारसा जपण्याचा प्रयत्न : बाळासाहेब देसाई
लँड ट्रिब्युनलचे माजी सदस्य बाळासाहेब देसाई म्हणाले की, उचगाव येथील श्री रामलिंग मंदिर हे या परिसरातील जागृत आणि पुरातन देवस्थान आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम परिसरातील युवकांनी हाती घेतले असून ते प्रगतीपथावर आहे.
मिथिल जाधव आणि सौरभ जाधव यांनी मंदिरासाठी दोन लाख २१ हजार रुपये किमतीची सागवानी चौकट देणगी दिली आहे. मंदिरातील पुरातन कलाकृती आणि वास्तुशैली जपण्याचा प्रयत्न केला जात असून, त्याच धर्तीवर चौकटीवरही नक्षीकाम करण्यात येत आहे. लवकरच ही चौकट मंदिरात आणून बसविण्यात येणार असून, त्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
यावेळी युवराज कदम यांच्या हस्ते चौकटीच्या कामासाठी एक लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आणि कामाची पाहणी करण्यात आली.





