बेळगाव लाईव्ह :नागपंचमी हा केवळ धार्मिक सण नसून निसर्गातील जीवसृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. साप हे शेतकऱ्यांचे शत्रू नसून पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदीर व इतर कुरतडणाऱ्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवणारे नैसर्गिक मित्र आहेत, असे मत सर्पमित्र भरतेश हेब्बाजी यांनी व्यक्त केले.
२५ वर्षीय हेब्बाजी गेल्या तीन वर्षांपासून सर्परेस्क्यूचे कार्य करीत आहेत. ते व्यवसायाने टाइल फिटिंगचे काम करतात. मात्र, शेती कुटुंबाची असल्याने शेतीच्या कामातही ते सहभागी होतात. त्यामुळे शेतांमध्ये आढळणाऱ्या सापांच्या वर्तनाचा त्यांना जवळून अनुभव आला आहे.
पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्याने ते आश्रयाच्या शोधात बाहेर पडतात. याच काळात उंदीरही बिळांमधून बाहेर येतात. शेतीची मशागत करताना सापांचा अधिवास विस्कळीत होण्यामुळे मानव-सर्प संघर्षाच्या घटना वाढण्याची शक्यता असते.
‘उंदीर पिकांचे नुकसान करतात, तर साप उंदरांची शिकार करतात. त्यामुळे साप हे शेतकऱ्यांचे नैसर्गिक मित्र आहेत,’ असे हेब्बाजी यांनी सांगितले.

साप दूध पितात, बीनच्या तालावर नाचतात, जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतात किंवा त्यांच्याकडे नागमणी असते, अशा अनेक समजुतींना वैज्ञानिक आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या वाड्यांमध्ये सापांसोबत खजिना सापडतो, ही समजूतही चुकीची असून अशा ठिकाणी उंदीर आणि लपण्यासाठी जागा मुबलक असल्याने साप आढळतात, असे त्यांनी सांगितले.
सर्पदंश झाल्यास मंत्र-तंत्र, जादूटोणा किंवा पारंपरिक उपचारांवर अवलंबून न राहता रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे. विषारी सर्पदंशासाठी अँटी-व्हेनम हेच विशिष्ट उपचार असल्याचे हेब्बाजी यांनी स्पष्ट केले.
साप दिसताच त्याला मारू नये. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून प्रशिक्षित सर्पमित्र किंवा संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी नागपंचमीच्या निमित्ताने केले.





