belgaum

भाजपचे अहोरात्र आंदोलन; बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहोरात्र धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंडप उभारून सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

विशेषतः महर्षी वाल्मिकी विकास महामंडळातील कथित ₹१८७ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत माजी मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात आली. आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांकडून “बी. नागेंद्र यांचा राजीनामा द्या” अशा घोषणा देण्यात आल्या.

माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आंदोलनस्थळी बोलताना, बी. नागेंद्र यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर यापूर्वी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. विविध तपास यंत्रणांच्या चौकशीचा संदर्भ देत, पुन्हा त्यांना मंत्रिपद देण्यात आल्याने भ्रष्टाचाराला सरकारचे समर्थन मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 belgaum

जोपर्यंत बी. नागेंद्र यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत बेळगावमध्ये हे अहोरात्र आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा ॲड. अनिल बेनके यांनी दिला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, भाजपने केवळ बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्यापुरते आंदोलन मर्यादित न ठेवता दुष्काळ निवारणासाठी मदत, सर्वसमावेशक सिंचन विकास, ज्येष्ठ नागरिक तसेच विधवा व दिव्यांगांच्या थांबवलेल्या पेन्शनचा प्रश्न आणि गरीबांच्या बीपीएल रेशन कार्ड रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातही आवाज उठवला आहे.

भाजपचे आमदार, जिल्हाध्यक्ष, माजी खासदार, माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे.

दरम्यान, आंदोलनाच्या ठिकाणी काही भाजप कार्यकर्त्यांकडून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणाही देण्यात आल्या.

भाजपने हे आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, आगामी काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.