बेळगाव लाईव्ह : नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागदेवतेची पूजा आणि दूध अर्पण केले जात असताना रायबाग येथे मात्र एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतात कचरा साफ करत असताना विषारी सापाने दंश केल्याने महिलेचा मृत्यू झाला.
मृत महिलेचे नाव सत्यव्वा शिवानंद शिंगे (४३) असून त्या रायबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी होत्या.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सत्यव्वा या नेहमीप्रमाणे सोमवारी शेतात कचरा काढण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. काम करत असताना शेतात लपून बसलेल्या विषारी कोळक मंडल सापाने त्यांना दंश केला.
सर्पदंशानंतर त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली. कुटुंबीय आणि स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
सत्यव्वा यांच्या निधनाने त्यांच्या मुलांसह कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. नागपंचमीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
ही घटना रायबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.





