belgaum

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑगस्ट रोजी किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नी जनजागृती करण्यात आली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या पर्यटकांमध्ये सीमाप्रश्नाबाबत जागृती करण्यात आली.

यावेळी तुळजाभवानी मंदिरात पूजा, आरती व प्रार्थना करून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी साकडे घालण्यात आले. यानंतर ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी प्रतापगड परिसर दणाणून गेला.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या पर्यटकांना १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचना करताना सीमाभागावर झालेला अन्याय तसेच सीमावासीयांच्या प्रश्नांची माहिती देण्यात आली. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध समस्यांबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.

 belgaum

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे वाई तालुका अध्यक्ष प्रताप जाधव यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील जनता आणि राजकीय नेत्यांना सीमाप्रश्नी जागृत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले.

१९८६ च्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा

या दौऱ्यात वाई येथील जॉली हॉटेलचे मालक आणि प्रसिद्ध ‘सम्राट मिसळ’चे संचालक मनोहर त्रिंबक पटवर्धन यांचीही भेट घेण्यात आली. गेल्या सुमारे ६० वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू असून आता दुसरी पिढी व्यवसायाची धुरा सांभाळत आहे.

मनोहर पटवर्धन यांनी १९८६ साली झालेल्या कन्नडसक्तीविरोधी आंदोलनात सहभागी होऊन तुरुंगवास भोगल्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्या आंदोलनात महाराष्ट्रातील तसेच स्थानिक अनेक नेते सहभागी झाले होते. समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आपणही मोर्चात सहभागी झालो होतो, असे त्यांनी सांगितले.

सीमाप्रश्न अद्यापही सुटलेला नसल्याची खंत व्यक्त करताना तरुण पिढीने सीमाप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचा आवाज बुलंद केला पाहिजे, असे आवाहन पटवर्धन यांनी केले. तसेच, ‘अजूनही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, असा विश्वास त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाचे विश्वनाथ पाखरे, अजित कुमठेकर, रामदास पाखरे, पंकज दास, नागराज पाखरे, जगन्नाथ, रवी यांच्यासह अनेक पर्यटक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.