belgaum

यरगट्टी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : एका बाजूला जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस होत असताना दुसऱ्या बाजूला अपेक्षित पाऊस न झाल्याने यरगट्टी, रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यरगट्टी तालुक्यातील कुरबगट्टी आणि इटनाळ गावांना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने भुईमूग, उडीद, मूग, मका, कापूस, ज्वारी यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिक भरपाई देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यरगट्टी, रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्यांत सुमारे 40 टक्के पावसाची कमतरता असल्याचे सांगितले. मागील दोन आठवड्यांपासून पाऊस झालेला नसून आणखी एक आठवडा पाऊस न झाल्यास पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

 belgaum

दरम्यान, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पीक विम्याच्या मुदतवाढीसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. बँकिंग तांत्रिक अडचणींमुळे सुमारे 60 टक्के शेतकऱ्यांना पीक विमा भरता आलेला नाही. विमा भरण्याची अंतिम मुदत 15 तारखेपर्यंत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी कालावधी मिळावा यासाठी परवानगी मागण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पीक नुकसानीचे महसूल, कृषी आणि फलोत्पादन विभागाच्या संयुक्त पथकाकडून सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत 60 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील नुकसानीचा अंदाज घेण्यात आला असून, पाऊस न झाल्यास पुन्हा सर्वेक्षण करून अंतिम अहवाल तयार केला जाणार असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. ऐहोळी परिसरातील सुमारे 1,500 एकर क्षेत्रातील नुकसानाचाही सर्वे करण्यात आला आहे.

नुकसानभरपाईबाबत बोलताना जारकीहोळी यांनी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निश्चित मदतीपेक्षा अधिक भरपाई राज्य सरकारकडून देण्याची भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी सिद्धरामय्या सरकारच्या काळात केंद्राच्या मदतीपेक्षा अधिक, काही प्रकरणांत दुप्पट मदत देण्यात आली होती. यावेळीही शेतकऱ्यांना केंद्रापेक्षा अधिक मदत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निदर्शनास ही बाब आणून राज्य सरकारकडून मदतीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ जाहीर करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अहवाल पाठविण्यात येणार असून, केंद्राच्या पथकाच्या पाहणीनंतर अधिकृत दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया होईल. मात्र, त्यापूर्वी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन जारकीहोळी यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या समस्या आणि पिकांच्या नुकसानीचा तातडीने आढावा घेऊन सरकारला अहवाल साद करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना दिले आहेत. आता पावसाची स्थिती आणि सरकारच्या मदतीच्या निर्णयाकडे यरगट्टी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.