बेळगाव लाईव्ह : पवित्र श्रावण महिना आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात श्रावणाच्या पहिल्या सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यरात्रीपासून अभिषेक, रुद्राभिषेक, त्रिकाल पूजा आणि पालखी प्रदक्षिणेसह विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.
श्रावण महोत्सवाची सुरुवात रात्री १२.३० वाजता पहिल्या अभिषेकाने होणार आहे. समस्त बेळगावकर नागरिकांच्या जनकल्याणासाठी दरवर्षी हा अभिषेक करण्यात येतो. पहाटे ४ वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक सुरू राहणार असून, त्यानंतर विशेष रुद्राभिषेक आणि त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७.३० वाजता भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. त्यानंतर विशेष महाआरतीने श्रावणाच्या पहिल्या सोमवारच्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कपिलेश्वर मंदिराच्या वतीने आकर्षक धार्मिक देखाव्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. यंदा राजमहालाच्या माध्यमातून हिंदू वैदिक धर्मातील पवित्र सप्तर्षींची माहिती भाविकांना करून देण्यात येणार आहे. भाविकांनी मंदिराला भेट देऊन सप्तर्षींच्या धार्मिक आणि वैदिक परंपरेची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.
मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. विनायक पालकर व त्यांच्या टीमसह राजू लोहार आणि बसवराज हुंदेकर यांच्या सहकार्याने ही सजावट साकारण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही टीम मंदिरातील देखावे आणि सजावटीची परंपरा जपत आहे.
पवित्र श्रावण महिना आणि नागपंचमीनिमित्त समस्त बेळगावकर नागरिकांना कपिलेश्वर मंदिराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.





