बेळगाव लाईव्ह : शहर आणि उपनगरांमध्ये विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या विविध कामांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था, L&T व गॅस पाइपलाइनची कामे, महापालिकेतील कामांमध्ये होणारी दिरंगाई, सार्वजनिक सुविधांचा अभाव आणि स्मार्ट सिटीच्या कामांतील कथित भ्रष्टाचार या मुद्द्यांवर नागरिकांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेची प्रस्तावना करत, ही परिषद कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून बेळगावच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घेतल्याचे स्पष्ट केले.
यावेळी कोंडुस्कर यांनी महापालिका प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देत गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि दुरवस्था तातडीने दूर करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन आणि मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
L&T आणि गॅस पाइपलाइनच्या कामांवर नाराजी
शहरातील विविध भागांत L&T तसेच गॅस पाइपलाइनसाठी वर्षानुवर्षे रस्ते खोदून ठेवले जात आहेत. पावसाळा आणि सणासुदीच्या काळातही रस्ते खोदलेले असल्याने वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची केली जाणारी डागडुजी निकृष्ट दर्जाची असल्याचेही सांगण्यात आले.
याशिवाय L&T कर्मचाऱ्यांकडून पाइप जोडणी, रोड कटिंग आणि इतर कामांसाठी नागरिकांकडून अतिरिक्त पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला. अधिकृत शुल्काव्यतिरिक्त कोणतीही रक्कम देण्याची गरज नसल्याचे सांगत, अशा प्रकारे पैसे मागितल्यास संबंधितांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

E-Aasti, PID आणि वीज मीटरसाठी दिरंगाई
E-Aasti, PID क्रमांक आणि वीज मीटर मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयीन पातळीवर दिरंगाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. काही कामांसाठी पैशांची मागणी होत असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
महापालिकेतील अधिकारी किंवा कर्मचारी PID क्रमांक अथवा अन्य कोणत्याही कामासाठी पैसे मागत असल्यास नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा
भाग्यनगर, अनगोळ रोड, सह्याद्री कॉलनी, खानापूर रोड तसेच उड्डाणपुलावरील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यात आले. काही रस्ते अवघ्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आले असूनही पुन्हा उखडल्याचा आरोप करत निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या अवघ्या काही दिवस आधी घाईघाईने रस्त्यांची थातुरमातुर डागडुजी केली जाते आणि काही महिन्यांतच हे रस्ते पुन्हा खराब होतात, अशी टीकाही करण्यात आली. शहरातील २०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या काळात भाविकांना खराब रस्त्यांमुळे त्रास होऊ नये, यासाठी गणेशोत्सवापूर्वी कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
स्मार्ट सिटीच्या कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप
स्मार्ट सिटीच्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि कमिशनखोरी झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. शहराला पुरस्कार मिळत असले तरी प्रत्यक्षात रस्ते आणि विकासकामांची अवस्था खराब असल्याचे सांगण्यात आले.
खासबाग मार्केट आणि साई मंदिरातील गाळ्यांचा वापर नाही
खासबाग भाजी मार्केट तसेच टिळकवाडी येथील साई मंदिर परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले दुकान गाळे वापराविना पडून असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकल्पांसाठी नागरिकांच्या करातून जमा झालेल्या पैशांचा वापर झाला असून त्याचा योग्य वापर होत नसल्याने सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप करण्यात आला.
महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची मागणी
बेळगावच्या मुख्य बाजारपेठेसह सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी पुरेशी आणि स्वच्छ सार्वजनिक शौचालये उपलब्ध नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. महिलांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
उद्यानांच्या देखभालीचा अतिरिक्त आर्थिक भार
महापालिका हद्दीतील उद्यानांची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही काही ठिकाणी नागरिकांकडून उद्यानांच्या देखभालीसाठी मासिक खर्च गोळा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. नागरिकांकडून आधीच कर आकारला जात असताना पुन्हा देखभालीचा खर्च घेणे हा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड असल्याचे सांगण्यात आले.
सरकारी रुग्णालयांच्या अवस्थेकडे लक्ष
शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा आणि व्यवस्थापनाचा अभाव असल्याने सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दाही पत्रकार परिषदेत मांडण्यात आला.
या सर्व मूलभूत समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करत प्रशासनाला पंधरा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची योग्य दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा आणि पुढील टप्प्यात मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
“नागरिकांकडून कोणत्याही कामासाठी पैसे मागितले जात असतील तर आमच्याशी संपर्क साधा,” असे आवाहनही पत्रकार परिषदेत करण्यात आले.





