इतर देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आल्यामुळे नव्याने आढळणाऱ्या सर्व कोरोनाग्रस्तांचे नमुने जिनाॅमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिली आहे. मात्र आम्ही आधीच त्या अनुषंगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
शहरात आज बुधवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री डॉ. सुधाकर म्हणाले की, चीन आणि जपान सह इतर काही देशांमध्ये पुन्हा अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या चीनमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे आपल्याला राज्यातील प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मिळेल यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
केंद्राच्या मार्गदर्शक सूचीनुसार कोरोनाग्रस्तांचे स्वॅब नमुने जिनॉमिक सिक्वेन्सिंगच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. याखेरीज पुढील पावले उचलण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.
सध्याच्या वैश्विक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आम्ही काही खबरदारीच्या उपायोजना हाती घेतले आहेत. बेंगलोरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आगमन होत असते आणि त्या ठिकाणी आम्ही प्रवाशांचे स्कॅनिंग सुरू केले आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्याची मोहीम आम्ही 100 टक्के यशस्वी केली आहे. बऱ्याच लोकांना खबरदारीचा बूस्टर डोस द्यावयाचा आहे. तेव्हा ज्यांनी हा डोस घेतलेला नाही त्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र सातत्याने जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवून आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज आहोत. आम्ही सर्व ती खबरदारी घेऊ आणि त्या संदर्भात नवी मार्गदर्शक सूची लवकरच जाहीर केली जाईल, असेही आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले