महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांच्या बेळगाव जिल्ह्यातील प्रवेशावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) 1973 कलम 144 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेचे सदस्य अर्थात खासदार धैर्यशील माने हे बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उद्या 19 डिसेंबर रोजी टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित महामेळाव्याला उपस्थित राहण्यास येणार आहेत
. त्यांच्याकडून प्रक्षोभक भाषण किंवा प्रक्षोभक व्यक्तव्य होण्याद्वारे भाषिक वैमनस्य निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्याचप्रमाणे कर्नाटकात राहणाऱ्या मराठी भाषिकांना भडकविण्याबरोबरच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी बेळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी नितेश के. पाटील यांनी
सीआरपीसी 1973 कलम 144 (3) अन्वये खासदार धैर्यशील माने यांनी 19 डिसेंबर 2022 रोजी बेळगाव सीमेच्या आत प्रवेश करू नये, असा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.