महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जिल्हा प्रशासनाकडून सशर्त परवानगी मिळाली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून इतर सर्व रस्ते सील बंद करून मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दुसऱ्या रेल्वे गेट येथील एकच मार्ग खुला ठेवला जाणार आहे.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी अलोक कुमार यांनी आज सकाळी व्हॅक्सिन डेपो येथील मेळाव्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील नेतेमंडळींना बेळगावात प्रवेश दिला जाणार नाही मात्र बेळगावचे स्थानिक लोक जर मेळावा भरवत असतील तर आम्ही त्यांना आडकाठी करू शकत नाही असे स्पष्ट केले आहे. त्यावेळीच जिल्हा प्रशासन या महामेळाव्याला परवानगी देणार हे स्पष्ट झाले होते. काल शनिवारी सायंकाळपासूनच व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या मैदानाला जोडणाऱ्या रस्त्यांवर दुचाकी वाहने व पादचाऱ्यांना जाता येता येईल इतकी जागा सोडून बॅरिकेड्स देखील टाकण्यात आले आहेत. सध्या व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरातील प्रत्येक घडामोडींवर पोलिसांची बारीक नजर आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्या पहाटेपासून सदर मैदानाला जोडणारे सर्वच रस्ते बॅरिकेड्सने सील बंद केले जाणार असून एकच मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे.
मागील वर्षीच्या महा मेळाव्या दरम्यान कन्नड संघटना कडून मेळावा स्थळी दाखल होत मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाही फेक करण्यात आली होती तश्या घटना टाळण्यासठी पोलिसांनी फक्त एकच प्रवेश खुले करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मंडोळी, नानावाडी, बेळगाव शहर, शहापूर, अनगोळ, वडगाव आणि खानापूर या सर्व दिशेकडून येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. व्हॅक्सिन डेपो मैदानावरील मेळाव्याला येण्यासाठी उद्या सोमवारी दुसऱ्या रेल्वे गेट समोरील रस्ता खुला ठेवण्यात येणार आहे. समिती पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी दुसऱ्या रेल्वे गेट येथील मार्गानेच मेळाव्याच्या ठिकाणी जावे. सुरक्षतता आणि खबरदारीचा उपाय म्हणून ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
समिती पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी त्या मार्गानेच मेळाव्याला उपस्थित राहून लोकशाहीच्या घटनात्मक मार्गाने आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले आहे. आता बेळगाव पोलीस प्रशासनाकडून सायंकाळी उशिरापर्यंत महामेळाव्याला परवानगी मिळवण्याची शक्यता आहे.
पार्किंगची सोय लेले मैदानावर
महामेळाव्याला सहभागी होण्यासाठी वाहने घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. वाहने लेले मैदानावर पार्क करावी व चालत दुसऱ्या गेट जवळील एंट्री ने डेपो मैदानावर यावे असे आवाहन करण्यात आले आहे.