बेळगाव लाईव्ह :
वारकरी महासंघ, बेळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – २०२६ अंतर्गत श्री जनार्दनबुवा उखळीकर दिंडी क्रमांक ४ (रथामागे) यंदा ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे पायी प्रस्थान करणार आहे. १९ दिवस चालणारी ही दिंडी २६ जुलै २०२६ रोजी आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचून सांगता होणार आहे.
वारकरी महासंघाने यंदाच्या दिंडीचा संपूर्ण कार्यक्रम, मुक्कामाची ठिकाणे तसेच दुपारच्या नैवेद्याची व्यवस्था जाहीर केली आहे. आळंदी ते पंढरपूर या पारंपरिक वारी मार्गावर हजारो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पायी प्रवास करणार आहेत.
दिंडीचा प्रारंभ बुधवार, ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून होणार असून पहिल्या दिवशी चिंच फाटा परिसरात मुक्काम असेल. त्यानंतर पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी मार्गे दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
दिंडी मार्गावर विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी दुपारच्या नैवेद्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदी, पुणे, सासवड, वाल्हे, निरा, लोणंद, निंभोरे, पिंपरद, धर्मपुरी, शंकर साखर कारखाना परिसर, भंडीशेगाव आणि वाखरी येथे नैवेद्याचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी पारंपरिक उभे रिंगण व गोल रिंगण सोहळेही पार पडणार आहेत.
रात्रीच्या मुक्कामासाठी पुण्यातील श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालय, सासवडमधील पुरंदर हायस्कूल, जेजुरी एमआयडीसी परिसर, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी तसेच पंढरपूर येथील वारकरी महासंघाच्या इमारतीत व्यवस्था करण्यात आली आहे.
वारीदरम्यान लोणंद येथे चांदोबाचा लिंब उभे रिंगण, पुरंदावडे परिसरात गोल रिंगण, खुडूस फाटा तसेच तोंडले-बोंडले परिसरात पारंपरिक रिंगण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांमुळे वारकरी भक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असते.

२६ जुलै रोजी आषाढ शुद्ध द्वादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर दिंडीची औपचारिक सांगता होईल.
वारकरी महासंघाने दिंडीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी शिस्त, स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत तसेच नियोजित वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे संपर्क : हभप शंकर बाबली महाराज 9945334058, 9341047011, 9421210865, 9448157320, 9356832313, 9423716501, 9423282794, 9481740211, 9741281560




