belgaum

मराठी फलक हटविणाऱ्यांवर कारवाई करा; समितीचा इशारा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील मराठी आणि इंग्रजी भाषेतील फलक पोलिसांकडून झाकण्यात किंवा हटविण्यात आल्याच्या प्रकाराविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच मराठी फलकांना लक्ष्य करणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, अशी मागणी समितीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शुक्रवारी (६ नोव्हेंबर) समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तथा माजी आमदार मनोहर किनेकर, अध्यक्ष प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण-पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर,अमर येळ्ळूरकर,आर एम चौगुले,नेताजी जाधव आदी उपस्थित होते. यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबरपूर्वी बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मराठी आणि इंग्रजी भाषेतील फलक कोणतीही कायदेशीर नोटीस किंवा पूर्वसूचना न देता झाकण्यात अथवा हटविण्यात आल्याचा आरोप समितीने निवेदनात केला आहे.

 belgaum

खासगी मालमत्तेवर व्यावसायिकांनी किंवा सामाजिक संस्थांनी लावलेले फलक हटविण्याचा पोलिसांना अधिकार नसल्याचे समितीने म्हटले आहे. संबंधित फलक सरकारी जागेवरील अतिक्रमण नसताना पोलीस प्रशासनाकडून अशी कारवाई करणे चुकीचे असल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.

यापूर्वी २२ जून २०२६ रोजीही मराठी फलक हटविण्याच्या प्रकाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे समितीने पुन्हा निदर्शनास आणून दिले.

समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या कार्यालयावरील फलक हटविण्याबाबत खडेबाजार पोलिसांकडून फोन आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. स्वतःच्या खासगी जागेतील कार्यालयावर लावलेला फलक हटविण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असा सवाल समितीने उपस्थित केला.

तसेच कन्नड संघटनांचे काही कार्यकर्ते व्यावसायिकांना मराठीऐवजी कन्नड भाषेत फलक लावण्यास सांगत असल्याचा आरोप करत अशा प्रकारांना प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली.

आठ दिवसांची मुदत; अन्यथा मोर्चा

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संबंधित पोलीस अधिकारी आणि कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांवर योग्य ती कारवाई करावी. शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रशासनाची असून, कोणत्याही संघटनेच्या दबावाला बळी न पडता योग्य भूमिका घ्यावी, असे समितीने स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्याशी झालेल्या चर्चेतही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. प्रशासनाने आठ दिवसांत ठोस कारवाई न केल्यास पुढील पंधरा दिवसांत मोर्चा काढून रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा समितीने दिला आहे.

त्यामुळे बेळगावातील मराठी फलकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेणार, याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.