गोवा येथे अलीकडेच आयोजित आव्हानात्मक खडतर अशी आयर्न मॅन 70.3 गोवा ही आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या बेळगावच्या 6 ट्रायथलीट्सचा ऑलिंपिक साईज सुवर्ण जेएनएमसी तलाव येथे काल गुरुवारी सत्कार करण्यात आला.
गोवा येथे गेल्या नोव्हेंबर महिन्यात आयर्न मॅन 70.3 गोवा या आंतरराष्ट्रीय शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर शर्यतीमध्ये 1.9 कि.मी. समुद्री, जलतरण 90 कि.मी. रोड सायकलींग आणि 21.1 कि.मी. धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश होता आणि शर्यत पूर्ण करण्यासाठी 8:30 तासाचा कालावधी देण्यात आला होता. मात्र बेळगावच्या डबल आयर्न मॅन संतोष शानभाग, आयर्न मॅन मयुरा शिवलकर, इंग्रजीत हलगेकर, श्रेया सुंठणकर, रोहन हरगुडे व डॉ. अमित पिंगट यांनी निर्धारित वेळेपूर्वीच आयर्न मॅन 70.3 गोवा शर्यत पूर्ण करून सुयश मिळविले.
हे सर्व ट्रायथलीट्स सुवर्ण जेएनएमसी तलावात पोहण्याचा सराव करत असल्यामुळे तलावाच्या व्यवस्थापन मंडळातर्फे काल गुरुवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी यांच्यासह इतर प्रशिक्षकांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी बोलताना कलघटगी यांनी आयर्न मॅन शर्यतीतील या यशस्वी ट्रायथलीट्सपासून प्रेरणा घेऊन भविष्यात उत्कृष्ट जलतरणपटू घडविण्यासोबतच दर्जेदार ट्रायथलीट्स तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे सांगितले.
उपरोक्त सहाही ट्रायथलीट्स सुवर्ण जीएनएमसी तलावाच्या ठिकाणी जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अजिंक्य मेंडके, अक्षय शेरेगार नितीश कुडूचकर व गोवर्धन काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचा सराव करतात.
तसेच त्यांना केएलई संस्थेचे चेअरमन डॉ प्रभाकरराव कोरे, रो. अविनाश पोतदार, स्वीमर्स क्लब बेळगावचे संस्थापक माकी कापडिया, लता कित्तूर व सुधीर कुसाणे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.