शाळा पूर्ववत सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचे वाटप केले जात होते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे पुन्हा एकदा माध्यान्ह आहार वितरण थांबून त्याऐवजी धान्य वाटप करण्याचा विचार शिक्षण खाते करत असून येत्या दोन-चार दिवसात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या मार्च 2020 पासून कोरोनाचे संकट निर्माण झाल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक महिने शाळांचे शटर बंद होते. मात्र शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासाठी उपलब्ध करून दिले जाणारे धान्य वितरित करण्यात आले.
प्रारंभीचे कांही महिने विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळीचे वितरण करण्यात आले. मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळ यासह तेल व मिठाचे पाकीट वितरित करण्यात आले. पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळा पूर्ववत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचे वितरण केले जात आहे. तसेच दूधही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात असून त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.
आता राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने कांही शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर शिक्षण खात्याने आता माध्यान्ह आहाराचे वितरण न करण्याचा विचार चालविला आहे.
याबाबत येत्या दोन -चार दिवसात निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली असली तरी काल मंगळवारी दहावीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार व दुधाचे वाटप करण्यात आले. सध्या शिक्षण खात्याकडून पुढील आदेश येईपर्यंत माध्यान्ह आहाराचे वितरण केले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.