बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे आगामी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साधेपणाने साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या स्वागत समितीची बैठक आज पार पडली.
बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या प्रजासत्ताक दिन स्वागत समितीची बैठक आज सकाळी महापालिका सभागृहात अध्यक्ष महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत स्वागत समितीच्या जबाबदार याबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना स्वागत समितीचे सदस्य विकास कलघटगी यांनी बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा राष्ट्रध्वजावर बंदी घातली जावी. त्याचप्रमाणे व्यापारी दुकानदारानी या ध्वजाची विक्री करू नये यासाठी बाजारपेठेत जनजागृती केली जावी. प्लास्टिकच्या पताकांवरही बंदी घातली जावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्लास्टिक ऐवजी कपड्याच्या पताका वापरल्या जाव्यात. त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी ध्वज आचारसंहितेचे पालन केले जात नाही. ध्वजस्तंभाची उंची, ध्वजाची गाठ व्यवस्थित बांधणे, सायंकाळी ध्वज खाली उतरवणे वगैरे बाबतीत चुका केल्या जातात. यासाठी राष्ट्रध्वज आचारसंहिते बाबत देखील जनजागृती केली जावी. पत्रके वाटली जावीत, अशा सूचना केल्या.
मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी गेल्या 13 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रम आयोजनाच्या बैठकीचा संदर्भ घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या कोरोनासंदर्भातील नियमानुसार कार्यक्रमाचे आयोजन होईल याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे सांगून आवश्यक मार्गदर्शन आणि सूचना केल्या. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि समस्या जाणून घेऊन मनपा आयुक्तांनी त्यांचे निरसन केले.
प्रारंभी महापालिका उपायुक्तांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. बैठकीस विकास कलघटगी यांच्यासह माजी नगरसेविका शीला देशपांडे, छाया कल्याणशेट्टी, यल्लाप्पा हुदली आदींसह सार्वजनिक बांधकाम खाते, हेस्कॉम आदी संबंधित अन्य खात्यांचे अधिकारी व प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.