साहित्यप्रेमींनी उशिरा का होईना मला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. यात भर म्हणून आता वाड्मय चर्चा मंडळाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मला आणखी चांगले लिखाण करण्याची ऊर्जा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया बेळगावचे लेखक, साहित्यिक व शिक्षक रणजीत चौगुले यांनी व्यक्त केली.
बेळगाव शहर परिसरातील साहित्यिक लेखकांचा परिचय करून देणारे माहितीपूर्ण सदर वृत्तपत्रातून लिहीत असल्याबद्दल शिक्षक व लेखक रणजीत चौगुले यांना यंदाचा वाड्मय चर्चा मंडळाचा ‘विशेष पुरस्कार’ जाहीर झाला आहे.वाङ्ममय चर्चा मंडळ बेळगावचा साहित्य पुरस्कार नेहमी पुस्तकांना दिला जातो मात्र पहिल्यांदाच हा पुरस्कार सदर लेखनाला जाहीर झालाय. यासंदर्भात बेळगाव लाईव्हने अभिनंदन करून रणजीत चौगुले यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते बोलत होते.
चौगुले म्हणाले की, बेळगाव परिसरात इतके लेखक होऊन गेले याची मला देखील कल्पना नव्हती. मात्र वृत्तपत्रातील सदर लिहिण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या बाबतची माहिती मिळत गेली. सुरुवातीला मी सध्याच्या प्रस्थापित लेखकांची यादी तयार करून लिखाणाची सुरुवात केली होती. परंतु जेंव्हा जुन्या लेखकांबाबत लिहिण्यास सुरुवात केली, त्यावेळी वाचकांनीही मला मदत केली. काही लेखकांनी फक्त दोनच पुस्तके लिहिली असली तरी ती साहित्य क्षेत्राने नोंद घेण्याजोगी आहेत असे त्यांनी सुचवले. या पद्धतीने माहिती मिळत गेली आणि प्रस्थापितांऐवजी जुन्या लेखकांवर माझे अधिक लिखाण झाले आहे.
खरेतर शिक्षकी पेशा सांभाळत माझ्या हातून इतके लिखाण झाले नसते. परंतु योगायोगाने मी लिखाणाला सुरुवात केली त्यावेळी लाॅक डाऊन जारी होऊन शाळा बंद झाल्या. त्यामुळे मिळालेल्या फावल्या वेळाचा पुरेपूर लाभ उठवून वृत्तपत्रातील सदर लिखाणात मी स्वतःला झोकून दिले. या माझ्या लिखाणाचे पुस्तक काढले जावे असा जवळपास सर्व वाचकांचा आग्रह आहे. माझे हे सदर लिखाण जवळपास वर्षभर चालेल असे वाटते. त्यामुळे या कालावधीत जर 100 हून अधिकहून लेखक झाले तर हा एक ऐतिहासिक दस्तावेज ठरणार आहे. त्यामुळे या लिखाणाचे पुस्तक काढण्याचा निश्चितच माझा विचार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांना मराठी भाषा व संस्कृतीचे धडे देण्याबरोबरच आपली ही भाषा व संस्कृती अधिक समृद्ध व्हावी याबाबतचे माझे योगदान थोडक्यात सांगायचे झाल्यास मी बेळगावच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राशी फार पूर्वीपासून जोडला गेलो आहे. मराठी साहित्य संमेलने असो, बेळगावातील शिक्षकांच्या मराठी विषयाच्या कार्यशाळा असोत किंवा बेळगाव परिसरातील समाज विज्ञान विषयाच्या कार्यशाळा असो. यामध्ये माझा नेहमीच पुढाकार असतो. बेळगावातील मराठी शिक्षकांना ऑनलाईन जास्तीत जास्त साहित्य मिळावे यासाठी माझे प्रयत्न राहिले आहेत. त्यांच्यासाठी अहमदनगरच्या तज्ञ शिक्षकांच्या कार्यशाळा घेण्यातही माझा पुढाकार राहिला आहे. सध्याची परिस्थिती पाहता शिक्षण केंव्हा ऑनलाइन होईल आणि केंव्हा ऑफलाईन होईल सांगता येत नाही त्यामुळे शिक्षकांनी आपले जास्तीत जास्त व्हिडिओ तयार ठेवून सज्ज राहिले पाहिजे अशी आमची इच्छा आहे, असे चौगुले यांनी स्पष्ट केले.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सदर लेखनाचे एक उदाहरण देताना त्यांनी गुर्लहोसुरच्या डाॅ. गणेश गर्दे यांची माहिती दिली. बेळगावात एकेकाळी सांस्कृतिक गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेव गल्लीप्रमाणे गुर्लहोसुर हे गाव देखील जुन्या काळात साहित्य -कलाकारांचे गांव म्हणून सुपरिचित होते. या ठिकाणी नामवंत मंडळी उदयास आली. हे गाव कालांतराने धरणाखाली जाऊन गुर्लहोसूरचे पुनर्वसन झाले. मात्र पूर्वीच्या गावातील डॉ. गणेश गर्दे या व्यक्तीचा जन्म बेळगावमध्ये झाला आणि शिक्षण सरदार हायस्कूलमध्ये झाले. त्या गर्दे यांनी 1908 -09 साली पुण्यामध्ये नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. याचा संदर्भ बेळगावात पूर्वी झालेल्या दोन नाट्य संमेलनांच्या माहितीमध्ये कुठेच आढळून येत नाही. डॉ. गणेश गर्दे यांच्या प्रमाणे पुष्कळ नामवंत मंडळी आहेत जी आपल्याला माहितीही नाहीत.
वृत्तपत्रातील माझ्या सदरातून त्या लोकांना मी प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करत आहे. साहित्यप्रेमींनी उशिरा का होईना मला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. माझ्या लिखाणासाठी मला फक्त कोल्हापूर, सांगली, सातारा, कराडच नव्हे तर न्यूयॉर्क, लंडन आदी ठिकाणी असलेल्या साहित्यप्रेमींनी माहिती पुरवून मदत केली आहे असे सांगून यापूर्वी वाड्मय चर्चा मंडळातर्फे पुस्तके मागून पुरस्कार दिले जात होते. यावेळी नवा पायंडा पाडताना त्यांनी मी काय लिहिले आहे याची दखल स्वतः घेतली आहे. या पुरस्कारामुळे आणखी चांगले लिखाण करण्याची ऊर्जा मला मिळाली आहे, असे लेखक रणजीत चौगुले यांनी सांगितले.