जीवनाचा प्रवास अनंत अडचणींनी भरलेला असतो, तो कधीच सरळ सुलभ राहत नाही. ही प्रेरणादायी कहाणी एका मुलीची आणि तिच्या कुटुंबाची (आई व मोठी बहीण) ज्यांनी आपले वडील /पतीला ऐन उमेदीच्या काळात गमावल्यानंतर एकत्रित एकसंध राहून येणाऱ्या प्रत्येक वादळावर समर्थपणे मात केली.
मुलीच्या आईने बेळगावच्या एका हेल्मेट बनविणार्या नामवंत कंपनीत काम करून आपल्या दोन्ही मुलींना धाकटी मुलगी 95 टक्के गुण मिळवून विशेष गुणवत्तेत दहावी उत्तीर्ण होईपर्यंत शिक्षण दिले. मात्र त्यानंतर पुढील शिक्षण देण्याइतकी आर्थिक ऐपत नसल्यामुळे आईला आपल्या मुलीचे शिक्षण थांबवावे लागले. मात्र त्याच वेळी मुलीच्या शाळेचे मुख्याध्यापक सतीश पाटील देवदूत सारखे त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी मुलीच्या पुढील महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी उचलताना त्यासाठी आर्थिक सहाय्य देऊ केले. त्यामुळे टिळकवाडीतील गोगटे कॉलेजमध्ये विज्ञान शाखेचा पदवीपूर्व अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. कोरोना महामारीचे संकट असतानाही आपल्या क्षमतेवर प्रचंड विश्वास असणाऱ्या त्या मुलीने पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षेत नेत्रदीपक 98 टक्के गुण तर मिळालेच शिवाय सीईटी परीक्षेमध्येही ती उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली.
या परीक्षेतील यशानंतर तिची इंजिनिअर होण्याची अर्थात अभियांत्रिकी पदवी संपादन करण्याची इच्छा होती. परंतु या अभ्यासक्रमाचे वार्षिक शैक्षणिक शुल्क तब्बल 90,060 रुपये इतकी असल्यामुळे दुर्दैवाने मुख्याध्यापक पाटील यांच्यासाठी तो खर्च आवाक्याबाहेरील होता. त्या प्रतिभावंत मुलीची परिस्थिती सामाजिक कार्यकर्ते किरण निप्पाणीकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ त्या मुलीसाठी लोकांकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना अल्पावधीत यश आले, जेंव्हा श्रीनिवास इंडक्शन हार्डनिंग बेळगावचे व्यवस्थापकीय संचालक दयानंद नेतलकर यांनी त्या मुलीला मदत करण्याची तयारी दर्शविली.
तसेच निप्पाणीकर यांच्यासमवेत त्यांनी त्या मुलीच्या घराला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्या मुलीच्या आईला महिन्याकाठी जेमतेम 8000 रुपये पगार मिळत असल्याचे नेतलकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ त्या मुलीच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारी दर्शविली, शिवाय मुलीला एक नवा लॅपटॉपही भेटीदाखल दिला.
सध्या त्या मुलीचे नांव शहरातील एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झाले आहे. सदर मुलीला मदत मिळवून देणाऱ्या किरण निप्पाणीकर यांना त्यांच्या या कार्यात कॉर्पोरेट आणि कम्युनिकेशन ट्रेनर सुषमा भट यांचे सहकार्य लाभले.
आता किरण निप्पाणीकर यांच्यासह अजय अहुजा व राजन सोनी या तिघांनी संबंधित संपूर्ण कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी उचलून त्यांना जीवनाच्या ताणतणावापासून मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. रक्षणकर्त्यांनी भरलेल्या आपल्या शहरात त्यांचीही मदत फार मोठी नसली तरी आदर्शवत नक्कीच आहे.
Source: Allaboutbelgaum.com