ग्रामपंचायतींमधील पंचायत विकास अधिकारी (पीडिओ) आणि तलाठ्यांना हिवाळी अधिवेशनाची ड्युटी देण्यात आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी गेल्या चार दिवसापासून पंचायतीकडे फिरकलेच नसल्यामुळे विकासकामांवर परिणाम जाणवत आहे.
दरवर्षी अधिवेशनाच्या निमित्ताने पीडिओ आणि तलाठ्यांना पंचायतीचे काम सोडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बरदास ठेवण्याचे काम सोपविले जाते. या काळात त्यांना इतर कोणतीच कामे दिली जात नाहीत. तालुक्यातील सर्व पीडिओ आणि तलाठ्यांना सध्या हॉटेल ड्युटी देण्यात आली आहे. दिवसभर बेळगावातील हॉटेलमध्ये दिवस-रात्र हे अधिकारी इतर वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बरदास्त ठेवण्याचे काम पहात आहेत.
हॉटेलमध्ये थांबलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींना काय हवे काय नको? हे पाहण्याची जबाबदारी पीडिओंवर सोपविण्यात आली आहे. एकंदर बेळगावातील अधिवेशन आधीच सर्वांसाठी डोकेदुखी ठरले आहे. त्यातच आता अधिकारीवर्ग नागरिकांच्या कामासाठी उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील सर्व विकास कामे रेंगाळली असून अधिकारीच नसल्याने नागरिकांना कामासाठी रोज पंचायतीच्या चकरा माराव्या लागत आहेत.
कांही ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांना अधिवेशनानंतर कामासाठी यावे, असे सांगितले जात आहे. तहसील कार्यालयातील अवस्था देखील तीच असून महसूल कर्मचारी तहसील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भेटत नसल्याचे चित्र आहे. सध्या सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून नागरिकांना माघारी पाठविले जात आहे.