सिंगिनकोप (ता. खानापूर) या गावाजवळील एका झाडाखाली मोठ्या प्रमाणात करनी बाधेचा अघोरी भितीदायक प्रकार केल्याचे उघडकीस आल्यामुळे गावकऱ्यात घबराट पसरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सिंगिनकोप गावानजीक एका झाडाखाली घोंगडे अंथरण्यात आले असून त्यावर शेकडो लिंबू, कुहळे, नारळ, बिब्बे, कुंकू आणि करणीबाधेत वापरण्यात येणारे साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले आहे.
तसेच जवळच्या झाडाला बाशिंग बांधण्यात आले असून त्या ठिकाणी पशुबळीचा अघोरी प्रकार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. गावाजवळच अशा प्रकारचा अघोरी प्रकार करण्यात आल्याने त्या ठिकाणी जाण्यास नागरिक धजावेणासे झाले आहेत.
करणी बाधेचा प्रकार केलेल्या ठिकाणापासून जवळच गावातील मुलांना खेळण्यासाठीची मोकळी जागा आहे. मात्र आता संबंधित अघोरी प्रकारामुळे त्या मैदानात लहान मुलांना खेळणेही धोक्याचे ठरते आहे.
परिणामी गावकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे. अलीकडे खानापूर तालुक्यात करणी बाधेच्या घटना वाढल्या असून त्यात अघोरी क्रियेत पशुबळी देण्याचा घटना उघडकीस आल्या होत्या. यावर वेळीच उपाय योजना करून अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. तरी तालुका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकातून जोर धरू लागली आहे.