बेळगावातील तुरकमट्टी येथील नियोजित आयटी पार्क बाबत संरक्षण खात्याकडून राज्याच्या माहिती तंत्रज्ञान खात्याला पत्र पाठविण्यात आले असून त्या जागेशी संबंधित मालकी हक्काचा वाद भविष्यात उद्भवू नये यासाठी खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात उच्च शिक्षण व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्वथ नारायण यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यावेळी आयटी पार्कसाठी तुरकमट्टी येथील जागा राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू व्हावी अशी मागणी केली होती.
त्या मागणीला उत्तर म्हणून संरक्षण खात्याकडून पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे येथील जागेची मूळ कागदपत्रे, त्यावरील मालकीहक्क, मालकीहक्क बदलाची प्रक्रिया यासंदर्भात पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. सदर जागा संरक्षण खात्याच्या मालकीची असल्याचा दावाही पत्रात करण्यात आला आहे.
गेल्या 2012 व 2013 साली तुरकमट्टी जागेच्या मालकीहक्का संदर्भात राज्य शासन व बेळगावचे जिल्हाधिकारी यांच्यात पत्रव्यवहार झाला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही केली होती. त्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीच्या मालकी हक्काबाबतची नोंद व अन्य औपचारिकता पूर्ण करण्याची सूचना संरक्षण खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावातील नियोजित आयटी पार्कचा विषय मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली.
दरम्यान, तुरकमट्टी येथे आयटी पार्कसाठी तेथील जागेची मागणी करण्यात आली आहे. ती जागा संरक्षण खात्याच्या मालकी असल्याचे राज्य शासना कळविण्यात आले आहे. तथापि ती जागा आयटीपार्कसाठी मिळण्याची आशा राज्य शासनाला आहे. तसे झाल्यास राष्ट्रीय महामार्गालगत आयटीपार्क सुरू होऊ शकते.