राज्याच्या या जीडीपीमध्ये भरघोस भर घालणाऱ्या बेळगावच्या दुर्लक्षित औद्योगिक क्षेत्राकडे सरकारने लक्ष देऊन येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी कांही नियम करावेत, अशी मागणी भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी एका निवेदनाद्वारे कामगार खात्याचे मंत्री शिवराम हेब्बार यांच्याकडे केली आहे.
भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्याचे कामगार खात्याचे मंत्री शिवराम हेब्बार यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन सादर यांना सादर केले.
यावेळी डॉ. सरनोबत यांनी बेळगाव औद्योगिक क्षेत्राची परिस्थिती, याठिकाणी परप्रांतातील कामगारांचे झालेले अतिक्रमण आणि त्यामुळे स्थानिक युवकांवर कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड याबाबत मंत्र्यांना थोडक्यात माहिती देऊन स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ठराविक नियम करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले.
कर्नाटकच्या सकल देशांतर्गत उत्पादनांमध्ये अर्थात जीडीपीमध्ये बेळगावचे औद्योगिक क्षेत्राचे भरीव योगदान आहे. तथापि बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राकडे सरकारचे हवे तसे योग्य लक्ष नाही. सध्या बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल येथील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात बेळगावात रोजगारासाठी येत आहे. परिणामी स्थानिक युवक दुर्लक्षिला जात असून त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तेंव्हा ही समस्या निकालात काढण्यासाठी ठराविक नियम अस्तित्वात आणणे गरजेचे आहे. बेरोजगारीमुळे येथील युवक वैफल्यग्रस्त होऊन व्यसनांच्या आहारी जात आहे. स्थानिकांसाठी हे वातावरण अतिशय अयोग्य आहे. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदनाचा स्वीकार करून मंत्री शिवराम हेब्बार यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदनासोबत मंत्री हेब्बार यांना भारत मातेची प्रतिमा देखील भेटीदाखल देण्यात आली. याप्रसंगी डाॅ. सोनाली सरनोबत यांच्यासह पंडित विजेंद्र शर्मा, प्रिया पुराणीक, डॉ. संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते