Tuesday, February 11, 2025

/

भटक्या कुत्र्यांनी घेतला सहा मुलांचा चावा

 belgaum

बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. भटकी कुत्री हल्ला करू लागली आहेत. हिंस्त्र बनत आहेत. त्यामुळे आता नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. बेळगाव शहरात या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा लहान मुले जखमी झाली असून शुक्रवारी दुपारी या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता तरी महानगरपालिका प्रशासन जागे होणार की नाही ?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहराच्या लक्ष्मी टेकडी, विनायक नगर, हनुमान नगर, विजयनगर आदी परिसरात या घटना घडल्या. यापैकी चार मुलांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इतर दोन मुलांवर खासगी इस्पितळांमध्ये उपचार करण्यात आले आहेत.

शहर आणि उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंबंधी अनेक संघटनांनी महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे .याचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. शुक्रवारी ही उपनगरातील चार मुली व दोन मुले कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

प्रशासनाने त्वरित या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांना ठार मारता येत नाही. त्यांना पकडून जंगलातली सोडता येत नाही. अशा परिस्थितीत नेमके काय करायचे असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे.

महानगरपालिका व स्मार्ट सिटी यंत्रणेने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी एखादा प्रकल्प उभारण्याची गरज आहे. या प्रकल्पांसाठी वारंवार प्रस्ताव देण्यात आला असला तरी त्याला राजकीय अडथळे निर्माण होत असल्याचे दिसून येत असून अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक बळी पडणार की काय अशी वेळ निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.