हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम हाती घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी बुधवारी पिटाळून लावल्यानंतर आज मोठ्या पोलीस फौजफाट्यासह बायपासच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. तथापि आज सकाळी शेतकऱ्यांनी पुनश्च आंदोलन छेडून बायपासला विरोध केला. यावेळी दडपशाही करून रणरागिनी बनलेल्या आंदोलनकर्त्या शेतकरी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम काल बुधवारपासून हाती घेण्यात आले आहे. मात्र काल रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन पिटाळून लावले होते. तथापि आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात पुनश्च बायपास रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. मोठ्या पोलीस फौजफाट्याच्या संरक्षणामध्ये हे काम सुरू करण्यात आले असून रस्त्याचे काम सुरळीत पार पडावे यासाठी कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलालाही पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान हालगा -मच्छे बायपास रस्त्यामुळे तिबार पीक देणारी अत्यंत सुपीक जमीन उध्वस्त होऊन संबंधित शेतकऱ्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ येणार असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बायपास रस्ता होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
आपल्या निर्धारानुसार शेतकऱ्यांनी आज सकाळी सुरू असलेले बायपास रस्त्याचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामध्ये बहुसंख्य महिला शेतकऱ्यांचा सहभाग होता. जोरदार निदर्शने करत महिला शेतकऱ्यांनी बायपासचे काम रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्नाटक पोलीसांनी नेहमीप्रमाणे दडपशाहीचे तंत्र अवलंबत महिला शेतकऱ्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे शेतकरी महिला रणरागिणी बनल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागताच आंदोलनकर्त्या महिला शेतकऱ्यांना अटक केली. यावेळी जबरदस्तीने शेतकरी महिलांना पोलीस वाहनांमध्ये डांबून नेण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या महिला प्रशासन व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्याबरोबरच पोलिसांच्या नावाने बोटे मोडताना दिसत होत्या.
दरम्यान, बुधवारी बायपासचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेतकऱ्यांनी तातडीने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन काम सुरू करू नये अशी मागणी केली होती. प्रादेशिक आयुक्तांनी न्यायालयात याचिका प्रलंबित असताना काम का सुरू केले? अशी विचारणा प्रांताधिकार्यांना केली असता ते निरुत्तर झाले होते.
शेतकऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले होते. तसेच शेतकऱ्यांवर होणारा अन्याय लक्षात घेऊन काम सुरू करण्यासाठी पोलिस बंदोबस्त देऊ नये अशी मागणीही केली होती. तथापि आज प्रचंड पोलिस बंदोबस्तात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे.