बेळगाव शहरातील एका खाजगी दंत वैद्यकीय महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दंत वैद्यकीय शाखेशी संबंधित या दोन विद्यार्थिनी मूळच्या बिहारच्या असल्याचे समजते. शहरातील एका खासगी दंत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत.
महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या या दोन्ही विद्यार्थिनींनी स्वयंप्रेरणेने कोरोना तपासणी करून घेतली होती. आता त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अलीकडेच धारवाड येथील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याचप्रमाणे चामराजनगर येथील एका मेडिकल कॉलेजमधील कांही विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान बेळगाव येथील संबंधित दोन विद्यार्थिनींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कोरोना बाधित दोन्ही विद्यार्थिनींना बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.