बेळगावात होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला ते 25 जण मुकणार असल्याची चर्चा आहे. ते 25 जण कोण, तर ते आहेत कर्नाटक विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य.
सदस्य असले तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आणि आचारसंहिता असल्याने या 25 विधानपरिषद सदस्यांना अधिवेशनात भाग घेता येणार नाही.
कर्नाटक विधानपरिषदेच्या याच 25 सदस्यांची मुदत येत्या 5 जानेवारीला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या 25 जागांसाठी निवडणूक जाहीर केली असून ती 10 डिसेंबर रोजी होणार आहे.
या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना 16 नोव्हेंबर ला जारी होणार असून 23 नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत आहे.24 नोव्हेंबर ला अर्जाची छाननी होईल तर 26 नोव्हेंबर ही अर्ज माघारीची शेवटची तारीख असेल.
यानंतर डिसेंबर महिन्याच्या 10 तारखेला निवडणूक तर 14 तारखेला मतमोजणी होऊन निकाल बाहेर पडेल. 16 डिसेंबर पर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया जारी राहणार असल्याने 16 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर याकाळात आचारसंहिता असेल. याचा फटका या 25 सदस्यांना बसू शकतो.