शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील एक पोलीस उपनिरीक्षक आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी चक्क सायकलवरुन गस्त घालत आहे. मार्केट पोलीस ठाण्याचे विठ्ठल हावण्णावर हे ते पोलीस उपनिरीक्षक असून गेल्या कांही दिवसांपासून रात्रीच्या वेळी ते एकटेच सायकलीवरून गस्त घालत असल्यामुळे या वेगळ्या ‘नाईट पेट्रोलिंग’चे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्याच्या आधुनिक युगात मोटार किंवा मोटरसायकलवरून पोलीस गस्त घातली जाते हे सर्वश्रुत आहे. मात्र या पलीकडे जाऊन पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांनी सायकलवरून पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली आहे.
सायकलिंगमुळे शरीराचा व्यायाम होण्याबरोबरच आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांना सहज भेटता यावे हा यामागील त्यांचा हेतू आहे. पोलिस म्हटले की सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. परंतु पोलीस आणि समाजातील दुरावा कमी व्हावा यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
पोलीस खाते जनस्नेही बनावे यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मध्यंतरी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पायी गस्त घालण्यास सुरुवात केली होती. मात्र ही गस्त अवघे कांही दिवस चालली त्यानंतर आता त्यामध्ये खंड पडला आहे. मार्केट पोलीस स्टेशन अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते.
या पार्श्वभूमीवर पोलिस उपनिरीक्षक हावण्णावर सायकलवरून नाईट पेट्रोलिंग सुरू केली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, गेल्या कांही दिवसांपासून आपण सायकलिंग करून नाईट पेट्रोलिंग सुरू केली आहे. सायकलवरून फेरफटका मारल्यास व्यायाम तर होतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना थेट भेटता येते, असे मत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांनी व्यक्त केले आहे.