बेळगावच्या सभोवताली रिंग रोडचा प्रकल्प असताना हलगा मच्छे बायपास चा घोळ कशासाठी या मुद्द्यावरून सुरुवातीपासूनच बेळगावच्या शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनाही बेळगावच्या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
हलगा मच्छे बायपास हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान करणारा असून त्या प्रकल्पाला आमचा कायमच विरोध राहील अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली होती आणि आजही कायम आहे.
हलगा मच्छे दरम्यान येणाऱ्या बायपास मध्ये जाणाऱ्या शेतजमीनी या तिबार पिके देतात या पिकांचे उत्पादन घेऊन शेतकरी आपली गुजराण करत असतो. अशावेळी ही सुपीक जमीन आम्ही या प्रकल्पाला देणार नाही. या बायपास ची कोणतीच गरज नाही. असा मुद्दा उपस्थित करून न्यायालयीन लढाही झाला. बायपास प्रकल्पाच्या एकंदर प्रक्रियेला शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे.
त्यासंदर्भात अनेकवेळा निवेदने आंदोलने देऊन झाली असली तरी प्रशासनाने मात्र शेतकऱ्यांची बाजू लक्षात घेतली नसल्यामुळे आता मात्र आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणात पेटले असून याची दखल प्रशासन,राज्य सरकार व केंद्र सरकारला घ्यावीच लागेल.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हा बायपास करण्याचा प्रयत्न किती महागात पडू शकतो याचा अनुभव आता प्रशासनाला आला असून एका शेतकऱ्याने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तर प्रकरण गंभीर स्वरूप धारण करू लागले आहे.
या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊनच या पुढील काळात प्रकल्प उभा करण्याची गरज आहे, अन्यथा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणातील रोष आता सहन करावा लागणार आहे.
हलगा मच्छे या दरम्यान ज्यांच्या ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यामध्ये सर्व भाषिक शेतकऱ्यांची संख्या मोठी असून या शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा आणि आपली जमीन राखण्याचा अधिकार मात्र प्रशासनाने दिलेला नाही. प्रकल्पाला विरोध केल्यावर अटक करणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेण्यात आल्यामुळे आता शेतकरी भडकले आहेत.