Monday, January 13, 2025

/

हलगा मच्छे बायपास आंदोलन चिघळले-जाळून घेऊन आत्महत्त्येचा प्रयत्न

 belgaum

आमची अन्नदात्री मायभूमि जमीन जर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही ,असा इशारा देऊन हलगा मच्छे बायपास प्रोजेक्टमध्ये शेत जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे. या बायपास विरोधातील आंदोलन पुन्हा एकदा चिघळले असून आकाश अनगोळकर या मच्छे येथील युवा शेतकऱ्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले आहे तर दुसऱ्या एका शेतकऱ्याने झाडावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांनी एकंदर प्रकरणाचा निषेध केला असून पोलिसांचा हस्तक्षेप, आंदोलक महिलांना आणि शेतकऱ्यांना होणारी अटक आणि इतर कारणांमुळे हे आंदोलन पूर्णपणे चिघळले असून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे.

अशोका या कंपनीने हलगा मच्छे बायपासचे काम सुरू करण्यास प्रारंभ केल्यामुळे शेतकरी हळुवारपणे या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली. त्यांनी या कामाला विरोध करून अशोका कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काम थांबविण्याची सूचना केली. ही आपली मायभूमी असून या मायभूमीत आम्ही तिबार पिके घेतो , जमिनीच्या माध्यमातून आमचे जगणे चालू असते ही जमीन आम्ही बायपाससाठी देणार नाही. असा एकमात्र इशाराच यावेळी शेतकऱ्यांनी दिला होता.

Halga machhe
काम बंद करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करून पोलिसांनी अटकेची कारवाई सुरू केली या प्रकाराने संतापलेल्या आकाश अनगोळकर या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले.त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो गंभीरपणे जळाला असून त्यामुळे शेतकरी आणखीनच भडकले आहेत

संबंधित तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आणखी एका संतप्त शेतकऱ्याने उंच झाडावर चढून वरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा पवित्रा घेतला असून त्यामुळे पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संबंधित शेतकऱ्याला खाली उतरण्याची विनंती करण्यात आली असली तरी जोपर्यंत हलगा मच्छे बायपासचे काम थांबत नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही. असा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे.
आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न पोलिस करत असताना शेतकरी भडकल्यामुळे प्रचंड अडचणी निर्माण झाल्या असून प्रमुख शेतकऱ्यांना तसेच नेत्यांना स्थानबद्ध करून पोलिसांनी बेळगाव ग्रामीण स्थानकांमध्ये मध्ये ठेवले आहे. महिला आक्रमक झाल्या असून महिलांनी रणरागिनीचे रूप घेतल्यामुळे महिला पोलिसांना पाचारण करून महिला शेतकऱ्यांना ही अटक करण्याचा प्रयत्न जोरदारपणे पोलिस करत आहेत .

सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनाने एका तासातच गंभीर वळण घेतल्यामुळे पोलिसांची पूर्ण अवस्था बिकट झाले असून बायपासचा विषय इतका गंभीर होईल याची कल्पना नसलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या शक्तीचा आता अनुभव आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.