हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम वेगाने सुरू असले तरी त्याच्याविरोधात शेतकरीदेखील ठाम असून आज सकाळी हालगा ब्रिजजवळ शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन छेडले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हालगा -मच्छे बायपासचे काम वेगाने सुरू ठेवले असले तरी शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आपला विरोध कायम ठेवला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची तयारीही सुरू केली आहे. गेल्या गुरुवारी प्रचंड पोलिस बंदोबस्तात मच्छे शिवारापासून सुरू झालेले बायपासचे काम चार दिवसातच अनगोळ शिवारापर्यंत पोहोचले आहे. रस्त्याचे काम झपाट्याने हालग्याच्या दिशेने सरकत असल्यामुळे आज सकाळी हालगा ब्रिजनजीक शेती असलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन छेडले.
यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्याकडील बायपासच्या विरोधातील सरकारी आणि न्यायालयीन आदेशाची कागदपत्रे अधिकाऱ्यांना दाखवून धारेवर धरले. तसेच हालगा -मच्छे बायपाससंदर्भातील अधिकृत अधिसूचना आणि वर्क ऑर्डरची प्रत दाखविण्याची मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी अधिसूचना आणि वर्क ऑर्डर दोन्ही आमच्याकडे आहे.
आम्ही तुम्हाला ते दाखवू शकतो, असे सांगितले. त्यावेळी शेतकऱ्यांनी आम्हाला आश्वासन नको. आत्ताच्या आत्ता अधिसूचना व वर्क ऑर्डरची कॉपी दाखवा, असा आग्रह धरला. यावरून जोरदार वादावादी झाली. यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना शांत करताना दिसत होते.
दरम्यान, शेतकर्यांकडून सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे काम कोणत्या आधारे सुरू केले आहे याची माहिती देण्याची विचारणा केली जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत काम सुरू ठेवण्यात आले आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू असल्याने शेतकरी देखील हतबल झाले आहेत. तथापि बायपासच्या कामाला शांततेच्या मार्गाने विरोध कायम ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.