नामवंत शरीरसौष्ठवपटू महेश मोरे यांचे निधन-ओमनगर (खासबाग) चौथा क्रॉस येथील रहिवासी नामवंत माजी शरीरसौष्ठवपटू आणि बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे संस्थापक सदस्य महेश मारुती मोरे यांचे आज सकाळी 11 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
निधन समयी महेश मोरे यांचे वय 54 वर्षे होते. त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा मोठी बहीण आणि दोन भाऊ असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी 2:30 वाजता शहापूर स्मशानभूमीमध्ये होणार आहे.
एकेकाळी नामवंत शरीरसौष्ठवपटू म्हणून सुपरिचित असणारे महेश मोरे यांचा बेळगावातील शरीरसौष्ठव क्षेत्र नावारूपास आणण्यात मोलाचा वाटा होता. बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे संस्थापक सदस्य असणारे महेश मोरे हे स्वतः राष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच देखील होते.
माणिकबाग व्यायाम शाळा अर्थात जिम्नॅशियममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करताना त्यांनी अनेक दर्जेदार शरीरसौष्ठवपटू घडविले. पॉलीहैड्राॅन कंपनी, श्री माता सोसायटीमध्ये काम केलेल्या महेश मोरे यांनी त्यानंतर भागीदारीमध्ये कपिलेश्वर कॉलनी येथे स्वतःची प्लॅटिनियम फिटनेस जिम ही अद्ययावत व्यायाम शाळा देखील सुरू केली होती. दुर्दैवाने कोरोना प्रादुर्भावामुळे ही जिम बंद पडली
त्यानंतर सध्या ते शहरातील पॅटसन फोर्ड उद्योग समूहात कामाला होते. आज सकाळी कामाच्या ठिकाणी त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
महेश मोरे हे एक नावाजलेले उत्कृष्ट करेलापटू देखील होते. शिवजयंती आणि गणेश विसर्जन मिरवणुकीप्रसंगी ते मोठ्या तडफेने करेला फिरवण्याची प्रात्यक्षिके सादर करत असत. त्यांच्या निधनामुळे विशेष करून बेळगावच्या शरीरसौष्ठव क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.