पेशाने डॉक्टर,सामाजिक कार्यकर्तीचा पिंड आणि समाजाच्या अडी अडचणींना धावून जाण्याची वृत्ती यामुळे गेल्या काही काळात डॉ. सोनाली सरनोबत हे एक नवे नेतृत्व उदयास आले आहे. आपल्या कामांच्या धडाक्याने त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जनतेच्या मनात छाप पाडण्यात त्या यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.
बेळगाव आणि परिसरात त्या आपल्या वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कार्यामुळे परिचित आहेतच शिवाय खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातही त्यांनी आपले काम सुरू केले आहे. अनेक अडकून पडलेल्या कामांना त्यांनी चालना देऊन जनतेला पायाभूत सेवा सुविधा देण्यास सुरुवात केल्यामुळे त्या खानापुरातील ग्रामीण जनतेसाठी सध्या मसीहाच ठरू लागल्या आहेत.
सोनाली सरनोबत या भाजप मध्ये महिला नेतृत्व म्हणून सक्रिय आहेतच शिवाय खानापूर मध्येही प्रभारी म्हणून पक्षाने त्यांची नियुक्ती केली आहे. हे पद मिळाल्यावर त्यांनी फक्त काचेच्या केबिन मध्ये न बसता खानापूर तालुक्यातील गावांचा दौरा केला आणि तेथील समस्या जाणून घेतल्या. गोरगरीब जनता,महिला आणि सर्वसामान्य कुटुंबांचे प्रश्न समजावून घेतले.कर्नाटकात भाजप चे सरकार आहे. यामुळे भाजपच्या एक सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी या समस्यांचे प्रतिनिधित्व केले. आणि जनतेला न्याय मिळवून दिला.
रेशन चे साहित्य मिळणे ही एक भारतीय नागरिक म्हणून सामान्य कुटुंबांची एक गरज आहे. त्यांचा तो अधिकार आहे. मात्र भुरूणकी आणि परिसरातील गस्तोळी, चणकेबैल आदी गावांना अद्याप रेशन दुकाने मंजूर करण्यात आली नव्हती, यासंदर्भात डॉ सोनाली यांनी आवाज उठवला आणि हा प्रश्न तडीस नेला.
या गावातील महिला आणि पुरुषांनी त्यांचा सत्कार करून त्यांनी दाखविलेल्या आस्थेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.सोनाली सरनोबत यांनी या प्रश्नाबद्दल थेट जिल्हाधिकारी आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे निवेदने दिली. गावा गावातील जनतेला त्यांच्या समस्या प्रकर्षाने मांडण्यासाठी एक नवे माध्यम मिळाले. प्रशासनही कोणाचेही ऐकत नाही. सोनारानेच त्यांचे कान टोचावे लागतात. सोनाली सरनोबत यांनी ते टोचले आणि निवेदन दिल्यानंतर काही दिवसातच या गावांना रेशन दुकाने मंजूर झाली. डॉ सोनाली स्वतः या गावात गेल्या आणि पहिल्या रेशन धान्याचे वाटप केले. भारतीय स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी या गावातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या धान्याचा घास मिळाला. त्यांच्या डोळ्यात तर आनंद होताच पण एक जुनी समस्या तडीस नेल्याची कृतकृत्यता डॉ सोनाली यांच्या डोळ्यातही जाणवत होती.
ग्रामीण तरुणांना आणि त्यांच्यातील कौशल्यांना प्राधान्य देण्यासाठीही डॉ सोनाली धडपडत आहेत. जोरदार प्रयत्नशील आहेत. त्यांनी खानापूर तालुक्यातील क्रिकेटपटूना प्रोत्साहन देण्याचे ठरविले असून त्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करून आपले हे स्वप्न पूर्ण करीत आहेत.
अरण्य विभागात राहणाऱ्या महिलांना स्वयं रोजगार,पुरुषांना अनेक सरकारी योजनांची माहिती देणे,तरुण आणि मुलांना शिक्षणाच्या सोयी आणि सवलती उपलब्ध करून देणे ही कामे त्या आवडीने करतात.
स्वतः त्या एक उत्तम डॉक्टर आहेत. अनेक रुग्णांची त्या काळजी घेतात. त्यांना सेवा पुरवितात. हे प्रचंड रुग्णसेवेचे काम करीत असताना समाजासाठी एवढा वेळ कधी मिळतो असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की आपण समाजासाठी आहोत. आणि समाजमुळे आहोत. ही जाणीव ठेवली आणि आवड असली की काम करायला सवड ही मिळतेच.कधीही न थकता सेवा करत राहण्याची त्यांच्यातील ऊर्जा खानापूर तालुक्यातील जनतेसाठी एक वरदानच ठरली आहे.
भाजप चा खानापूर तालुक्यातील एक नवा राजकीय चेहरा म्हणून त्यांची ओळख बनत आहे. याबद्दल त्यांना विचारले असता,काम केले की चर्चा होते आणि रिकग्निशन मिळते हे खरे आहे. मी माझ्या पक्षाच्या सेवाभाव या विचारधारेशी मिळते जुळते काम करीत आहे. यातून पुढील काळात संधी मिळाली तर जनतेच्या आशीर्वादाच्या जीवावर त्या संधीचे सोनेच करेन.