गोरगरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणाऱ्या बेळगावात थंडीचा कडाका हळुवारपणे वाढू लागला आहे. बेळगावच्या थंडीचा अनुभव घेण्यासाठी गोमंतकीय नागरिक बेळगावात दाखल होऊ लागले असून या थंडीने एक नवे आल्हाददायक असे वातावरण तयार केले आहे.
बेळगाव ची थंडी अनुभवण्याची संधी अनेक जण सोडत नाहीत. मुंबई आणि पुण्याचे नागरिक असो अर्थात तेथे स्थायिक झालेले बेळगावकर आणि गोमंतकीय नागरिक सध्या येथे येत असून बेळगावच्या थंडीचा अनुभव घेण्यासाठी खास हिवाळ्यात बेळगाव ची सहल करत आहेत.
यंदा थंडी काहीअंशी उशिरा नंतर सुरू झाली असली तरी त्या थंडीचे महत्त्व ज्यांना माहित आहे अशा लोकांची बेळगावात गर्दी होत आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने दाखल होऊन त्यानंतर काही काळ आपली सुट्टी वाढवून बेळगावच्या थंडीचा आनंद घेण्याच्या प्रमाणात वाढ झालीआहे.
दिवसाच्या वेळी उन्हाच्या प्रचंड झळा बसत असतानाच सायंकाळी थंडीची चाहूलही हळूहळू लागू लागली आहे.
शहरातील किमान तापमानात घट होत असून, पारा आता किमान 16.5 अंशांपर्यंत खाली आला आहे. येत्या काही दिवसात तापमानात आणखी एक-दोन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.
नवरात्रीनंतर कोजागिरी पौर्णिमा झाली की हवामानातील गारवा हळूहळू वाढू लागतो.मात्र यावर्षी दिवाळी सण झाल्यानंतर थंडीची चाहूल लागू लागली आहे. पावसाचे ढगाळ वातावरण आता गेले असुन संपूर्ण आकाश निळेशार दिसत आहे. शहरात रविवारी 25.9 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान होते तर दोन दिवसानतर 16.5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले आहे. कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक पडत असल्याने दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे वातावरण आता अनुभवयास मिळत आहे.
बेळगाव शहराबरोबर ग्रामीण भाग, खानापुर, चंदगड भागातही किमान तापमानात घट होऊ लागली आहे. किमान तापमान 12 अंशांपर्यंत खाली येईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.