टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोतील वृक्षतोडी विरोधात बेंगलोर येथील मुख्य न्यायाधीशांकडे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची सुनावणी काल बुधवारी झाली असून न्यायाधीशांनी डेपो येथे झाडे लावा. मात्र पडलेल्या झाडालाही हात लावायचा नाही, असे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वकिलांना सुनावले आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
व्हॅक्सिन डेपोतील वृक्षतोडी विरोधात बेंगलोर येथील मुख्य न्यायाधीशांकडे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याठिकाणी बुधवारी पुन्हा सुनावणी होऊन बेळगाव स्मार्ट सिटी लिमीटेडच्या वतीने वकिलांनी व्हॅक्सिन डेपोमध्ये झाडे लावण्यासाठी परवानगी मागितली. यावेळी न्यायाधीशांनी जनहित याचिकाकर्त्यांच्या वकिलांना तुमचे म्हणणे काय? असे विचारले. त्यावेळी झाडे लावण्यास आमची कांहीही हरकत नाही. मात्र तेथे कोणत्याही प्रकारच्या झाडाला हात लावू नये. वृक्षतोड केली जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार न्यायाधीशांनी झाडे लावा. मात्र पडलेल्या झाडालाही हात लावायचा नाही, असे स्मार्ट सिटीच्या वकिलांना सुनावून स्थगीती आदेश कायम केला आहे.
जनहित याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. सतिश बिरादार आणि ॲड. किरण कुलकर्णी यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. यावेळी न्यायाधीशांनी तुमचे म्हणणे सविस्तरपणे गरजेचे आहे. मात्र वेळ कमी असल्यामुळे 25 ऑक्टोबरला पुढील सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले आहे. ॲड. बिरादार व ॲड. कुलकर्णी यांनी आपली बाजू भक्कम मांडल्यामुळे याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. न्यायाधीशांनी स्थगिती आदेश कायम ठेवल्यामुळे व्हॅक्सिन डेपो येथे केवळ वृक्षारोपण करण्यासाठी स्मार्ट सिटीला परवानगी असेल. आता येत्या 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीदरम्यान या याचिकेवर वाद-प्रतिवाद होणार असल्यामुळे साऱ्यांचे विशेष करून टिळकवाडीवासियांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.