सीमाभागातील मराठी भाषिकांकरीत अपारंपारिक स्वरूपाचे शिक्षण देण्यासाठी श्री शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि लोक विकास केंद्र यांच्या अंतर्गत कौशल्य व उद्योजकता प्रमाणपत्र अभ्यासक्रम केंद्र शिनोळी (ता. चंदगड) येथील वसंत विद्यालय येथे सुरु झाला आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत त्यांनी सीमाभागात शिवाजी विद्यापीठाचे कांही कौशल्य व उद्योजकता विकासावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार विद्यापीठाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून अभ्यासक्रम सुरू होत आहेत. केंद्राच्यावतीने सध्या पाच अभ्यासक्रम सुरू होणार असून त्यासाठी नांव नोंदणीस प्रारंभ झाला आहे.
या अभ्यासक्रमांमध्ये काजू प्रक्रिया उद्योग व विक्री, बटाटा व रताळी प्रक्रिया उद्योग व विक्री, टॅली, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, ड्रेस डिझायनिंग यांचा समावेश आहे. एका बॅचसाठी किमान 20 ते 50 विद्यार्थी असणार आहेत.
अभ्यासक्रम हे स्थानिक भागाची गरज व उपयुक्तता विचारात घेऊन सुरू करण्यात येत आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी वसंत विद्यालय शिनोळी येथील कार्यालयात संपर्क साधावा आणि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नांव नोंदणी करावी, असे आवाहन श्री शिवाजी विद्यापीठाने केले आहे.