पाणी मागण्याच्या बहाण्याने घरांमध्ये शिरून अनेक महिलांवर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा उमेश रेड्डी याची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली आहे. परिणामी त्याची अंमलबजावणी लवकरच बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात होण्याची दाट शक्यता आहे. या कारागृहात 5 जणांचे खून करणाऱ्या हनुमंत मल्ला याला नोव्हेंबर 1983 मध्ये शेवटची फाशी देण्यात आली होती.
उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना उमेश रेड्डी यांच्या वकिलांनी उमेश मानसिकदृष्ट्या खचल्यामुळे त्याच्या आईने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. मात्र या अर्जावर निर्णय घेण्यास राष्ट्रपतींनी 2 वर्ष तीन महिने कालावधी घेतला, शिवाय अर्ज फेटाळताना योग्य कारण ही दिले नाही. उमेशच्या मानसिक स्थितीचाहि विचार केला नाही. ही बाब संविधानाच्या परिच्छेद 21 चे उल्लंघन ठरते. उमेशने आत्तापर्यंत मृत्यू समान शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करावे याचिकेचा निकाल होईपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी करू नये अशी विनंती उच्च न्यायालयाकडे केली. मात्र हा युक्तिवाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरविंद कुमार व न्यायाधीश प्रदीप सिंग येरूर यांच्या विभागीय पीठाने फेटाळून लावला. तसेच राष्ट्रपतीने दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब केला नसल्याचे स्पष्ट करून त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
विकृत मनोवृत्तीचा उमेश रेड्डी सुरुवातीला सीआरपीएफमध्ये होता. मात्र त्याच्या कारण यामुळे त्याला बडतर्फ केले होते. त्यानंतर तो जिल्हा राखीव सशस्त्र पोलीस दलात भरती झाला होता. 1998 मध्ये अत्याचार खून प्रकरणी त्याला अटक झाली होती. त्यानंतर अनेक वेळा तो फरार झाला होता. पाणी मागण्याच्या बहाण्याने त्याने अनेक घरांमध्ये शिरून महिलांवर अत्याचार करून त्यांचे खून केले होते.
उच्च न्यायालयाने उमेश रेड्डी याची फाशीची शिक्षा कायम केल्यामुळे या शिक्षेची अंमलबजावणी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात होण्याची दाट शक्यता आहे. ब्रिटिशांनी 1923 साली हिंडलगा कारागृहात बांधले आहे. या कारागृहात फाशीचे तीन स्तंभ आहेत. ज्या कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली असते त्याचे फाशीच्या तारखेच्या एक -दोन दिवस आधी प्रथम काळ्या कोठडीत (डार्करूम) विलगीकरण केले जाते. फाशीची शिक्षा ही दिलेल्या वेळेवर अचूक केली जाते. यासाठी न्यायालयाकडून शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी फाशीची तारीख निश्चित केली जाते आणि हा आदेश हिंडलगा कारागृहात अधीक्षक तसेच राज्य सरकारकडे पाठविला जातो.
राज्य सरकार मग ब्लॅक गॅझेटद्वारे फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचे नांव प्रसिद्ध करते. या प्रक्रियेनंतर कारागृह अधीक्षक शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी फाशीचा स्तंभ तयार करतात. ही सर्व प्रक्रिया अवघ्या तासाभरात पूर्ण होते. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांसमोर बंधित अधिकारी फाशीच्या वेळेपूर्वी तासभर आधी कारागृहात हजर होतात.