गोकाक तालुक्यातील गरीब हलाखीची परिस्थिती असलेल्या दिव्यांग मुलांना व्हील चेअर, वाॅकर आदी साधनांची गरज असून ही गरज पूर्ण करण्यासाठी दानशूर व्यक्ती, संघ -संस्था व नागरिकांनी आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहन हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी केले आहे.
गोकाक तालुक्यातील घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असलेल्या 32 दिव्यांग मुला-मुलींना व्हील चेअर, वॉकर, श्रवण यंत्र आदींची गरज आहे. ही मुले गोकाक शहर व ग्रामीण भागासह शिवापुर, धुपदाळ, कोन्नुर, मडवाळ व सुळधाळ या ठिकाणची असून गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांच्या पालकांसाठी आपल्या मुलांना उपरोक्त साधनं खरेदी करून देणे आवाक्याबाहेरचे आहे.
यासाठी आपण आपल्या सेवाभावी संघटनेतर्फे या मुला-मुलींना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, अशी विनंती सार्वजनिक शिक्षण खात्याच्या गोकाक गटशिक्षणाधिकार्यांनी हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना एका पत्राद्वारे केली आहे. तसेच संबंधित 32 दिव्यांग मुला मुलींची यादी त्यांना गरज असलेल्या साधनांसह अनगोळकर यांच्याकडे धाडली आहे.
सुरेंद्र अनगोळकर यांनी गटशिक्षणाधिकार्यांच्या विनंतीला मान देऊन सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. कोरोनाचे संकटासह आजार, अपघात आदी कारणास्तव आपल्याला अशक्तपणा येतो किंवा चालणे अवघड होते, यासाठी बरेच जण व्हीलचेअर अथवा वॉकरचा आधार घेतात.
मात्र कालांतराने आजारातून बरे होताच ही साधने अडगळीत टाकली जातात. तेंव्हा अशी अडगळीत टाकलेली दिव्यांगांना उपयोगी पडतील अशी साधने हेल्प फाॅर नीडीकडे सुपूर्द करावीत. त्याचप्रमाणे व्हिलचेअर, वॉकर, श्रवण यंत्रे वगैरे
साधने नव्याने खरेदी करून देण्याची ज्यांची ऐपत आहे अशा दानशूर व्यक्ती व संघ -संस्थांनी आपल्याशी 9880089798 या क्रमांकावर संपर्क साधावा. ज्यामुळे त्यांच्याकडून गोकाक तालुक्यातील संबंधित दिव्यांग मुलांची चांगली सोय होऊन त्यांना दिलासा मिळेल, असे आवाहन सुरेंद्र अनगोळकर यांनी केले आहे.