लाॅक डाऊन आणि कोरोना प्रादुर्भावासंदर्भातील निर्बंधांमुळे बिकट परिस्थिती ओढवली असतानाही पारंपारिक सर्कस कलेचा वारसा जोपासणाऱ्या निपाणी येथील सुपरस्टार सर्कसच्या कलाकारांसाठी बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे नुकतीच सुमारे 15 हजार रुपयांच्या जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली.
निपाणीतील सुपरस्टार सर्कस मधील कलाकारांच्या उपेक्षित जगण्याची व्यथा स्थानिक वृत्तपत्र माध्यमातून निदर्शनास येताच बेळगाव फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी युद्धपातळीवर सुमारे 15 हजार रुपयांच्या जीवनावश्यक साहित्याची जमवाजमव करून ते साहित्य नुकतेच निपाणी येथे जाऊन सुपरस्टार सर्कसच्या कलाकारांकडे सुपूर्द केले. या जीवनावश्यक साहित्यामध्ये तांदूळ, खाद्यतेल, कांदे-बटाटे, चहा पावडर, साखर विविध प्रकारच्या डाळी आदींचा समावेश आहे. यावेळी बोलताना संतोष दरेकर म्हणाले, सर्कस मधील 100 लोकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध होत नाही याची माहिती मिळताच एका रात्रीत सर्व मित्रांच्या मदतीने सदर साहित्य खरेदी केले आहे.
फूल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही सर्कसच्या कलाकारांना ही मदत देत आहोत. त्याचा त्यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे असे सांगून समाजातील दानशूर आणि आपल्या परीने मदत करावी. सर्वांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्कसला एकदा तरी भेट द्यावी, असे आवाहन दरेकर यांनी केले.
याप्रसंगी सुपरस्टार सर्कसचे मालक प्रकाश माने व व्यवस्थापक सलीम सय्यद यांच्यासह डॉ आनंद कोटगी, डॉ देवदत्त देसाई, डॉ. समीर शेख, व्हीक्टर फ्रान्सिस, राहुल पाटील, मनोज मत्तिकोप, राजू काकती, महेश जाधव, नकुल टुमरी, हेमंत पाटील आदी उपस्थित होते. जीवनावश्यक साहित्याची मदत करून सुपरस्टार सर्कस कलाकारांचा दुवा मिळवणार्या फेसबुक फ्रेंड सरकारच्या कार्याचे निपाणीवासियांमध्ये कौतुक होत आहे.
गेल्या दीड वर्षापासून निपाणी भागात सुपरस्टार सर्कस दाखल झाली आहे. विविध खेळांच्या माध्यमातून सर्कस लोकांच्या मनात घर करेल असा विश्वास होता. मात्र कोरोनामुळे लाॅक डाऊनची प्रक्रिया सुरू झाली, परिणामी सर्कसमध्ये काम करणार्या 82 कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. भविष्यात सर्कस कलाकारांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही असे विचार उपरोक्त जीवनावश्यक साहित्य वितरणाप्रसंगी व्यक्त करण्यात आले.