मार्केट पोलीस निरीक्षक तुळशीगेरी यांनी आपल्या सहकाऱ्या सह मार्केट भागात चालत गस्त घातली आणि चालत चालत जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
बेळगाव शहरातील सर्व पोलीस स्थानकांच्या व्याप्तीतील बीटनुसार इनचार्ज पोलीस अधिकारी बीट कर्मचाऱ्यांसह आजपासून दररोज सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत आपापल्या बीटमध्ये पायी गस्त घालत आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी हा आदेश काढला असून शहरवासीयांनी त्यांच्या कांही सूचना अथवा तक्रारी असतील तर त्या आपल्या भागातील गस्ती पथकाकडे नोंद कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शहर परिसरात गेल्या कांही महिन्यांपासून गुन्हेगारीत तसेच अवैध प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. शहरवासीयांमध्ये देखील यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होण्याबरोबरच पोलीस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात होती.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बहुदा याची गांभीर्याने दखल घेतली असावी म्हणूनच बीटनुसार पायी पोलीस गस्तीचा हा आदेश काढण्यात आलेला आहे.
पोलिस प्रशासनाच्या या मोहिमेमुळे आता नागरिकांना आपापल्या भागातील गैरप्रकारांना वाचा फोडण्याची संधी उपलब्ध होणार असल्यामुळे समाधान व्यक्त होणार आहे.